जन साहस संस्था व पुणे, जळगाव जिल्हा प्रशासन आणि विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्तीक प्रयत्नांनीडांबून ठेवलेल्या महिंदळे येथील ऊसतोड मजुरांची सुटका
चोपडा, दि. २४ (प्रतिनिधी): महिंदळे (ता. भडगाव) येथील आठ सदस्यीय मजूर कुटुंबीयांना ऊसतोडणीच्या कामासाठी नेऊन दौंडमध्ये (पुणे) नजरकैदेत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या आठही सदस्यांना जन साहस संस्थेच्या माध्यमातून पुणे आणि जळगाव प्रशासनाने सुखकर 'गृह' वाटेवर आणले आहे. बुधवारी दुपारी मजूर कुटुंबीय जळगाव कामगार कार्यालयात दाखल झाल्यानंतर घरी परतले.
सोनू सुरेश भिल व अंकुश अंबर भिल यांनी जनसाहस संस्थेकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनुसार मुकादम भुऱ्या चौधरी, टोळी मुकादम उत्तम सोनवणे यांच्याकरवी दौंड येथील शांतारामशेठ नामक व्यक्तीकडे मजुरांना ऊसतोडणीसाठी नेले होते. प्रत्यक्षात मात्र गुन्हाळावर जुंपले. तीन महिना काम केल्यानंतर उचल केलेल्या ५० हजारांचा हिशेब दिला आणि अतिरिक्त मजुरीची रक्कम मागितली. मात्र, हातात दमडीही दिली नाही. तीन लाख द्या अन्यथा घरी जाऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर मजूर कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता वाढू लागली. त्यानंतर नजरकैदेत ठेवत मोबाईलचा वापरही बंद केला. एका लोकप्रतिनिधीकडे दाद मागितल्यानंतर मालक, मुकादम यांनी धमकी देत जास्तीचे पैसे स्वीकारल्याचा स्टॅम्प लिहून घेतला. त्यासोबतच काहींनी मारहाणदेखील केली. त्याचवेळी काही मजुरांनी पळ काढला. मात्र, लेकरांसह अडकलेल्या आठजणांना मालकाच्या दावणीलाच बांधून ठेवले.पळ काढून घरी पोहोचलेल्या मजुरांनी जन साहस फाऊंडेशनशी संपर्क केला. क्षेत्र अधिकारी सोनम केदार यांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी, कामगार अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू झाला. मात्र, पोलिसांचा हलगर्जीपणामुळे पुन्हा प्रक्रिया लांबली. शेवटी विधि सेवा प्राधिकारणाकडे दाद मागितली. त्यानुसार महसूल, पोलिस व कामगार अधिकाऱ्यांसोबत जनसाहस संस्थेचे जिल्हा संस्थेचे जिल्हा समन्वयक नीलेश शिंदे, अॅड. वीरसेन काजळे, क्षेत्र अधिकारी सोनम केदार, पुणे निर्माण व जन साहस संस्थेचे जिल्हा समन्वयक सिद्धी भाइशेटे, क्षेत्र अधिकारी अॅड. सुनील मस्के, वर्षा बोराडे यांनी मजुरांना ताब्यात घेत जळगावच्या कामगार अधिकारी कार्यालयात आणले. त्या ठिकाणी नोंद घेऊन या मजुरांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले.
या मजुरांमध्ये रेखाबाई प्रकाश भिल (३५), राधिका प्रकाश भिल (१४), दादू प्रकाश भिल (८), दीपाली प्रकाश भिल (वय ७), सुनीता से सोनू भिल (२४), विशाल सोनू भिल (२), चिमा सोनू भिल (४) यांचा समावेश असून हे सर्व मजूर कुटुंबीय सुखरूपपणे घरी परतले आहेत.