अडावद येथे सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
अडावद ता.चोपडा (विशेष प्रतिनिधी) : येथील मधला माळी वाड्यातील रहिवासी नवल ताराचंद महाजन (५४) या शेतकऱ्याने सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
२६ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास नवल ताराचंद महाजन (५४) राहत्या घरात गळफास घेतला. याबाबत खबर मिळताच अडावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात त्यांनी शव उत्तरीय तपासणी व शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
नवल महाजन यांच्या आत्महत्ये बाबत त्यांच्या निकटवर्तीयांकडून कळाले की, ते अल्पभूधारक शेतकरी होते. सदर शेती कसण्यासाठी त्यांनी अडावद विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज घेतले होते. खराब हंगामात त्यांनी मका लावगवड केली होती. मात्र अतिपावसामुळे तो शेतातच सडल्याने सडका मका शेतातून बाहेर काढण्यास खर्च लागला. शेताची मशागत, बियाणे, रासायनिक खते, फवारणी, मजुरी असा सर्व खर्च अंगावर पडला. पुन्हा हात उसनवारी करून बाहेरून पैसे घेऊन रब्बीत कांदा लागवड केली. आता शेवटचे पाणी भरले कांद्याच्या पिकावर आपले सर्व कर्ज फिटेल या आशेत असतांना कांद्याचे भाव गडगडले येणाऱ्या उत्पन्नातून सोसायटीचे कर्ज व हात उसनवारीचे पैसेही फिटणार नाही, पुढील हंगाम व प्रपंच यासाठी पैसा कसा उभारायचा? या विवंचनेत असतांनाच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलूनआपली जीवनयात्रा संपवल्याची चर्चा परिसरात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.