विद्यार्थ्यांनी वयात योग्य दिशेने पाऊल टाकायला शिकावं : पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे महत्वपूर्ण सल्ला
चोपडा दि१९(प्रतिनिधी)- विद्यार्थांचे हे वय अतिशय नाजूक असते. या वयात आमिषांना न भुलता स्वतःला योग्य वेळी सावरले पाहिजे. मुलामुलींनी चांगलं वाईट ओळखायला शिकले पाहिजे. आयुष्याला योग्य दिशा मिळणे आवश्यक आहे. याच काळात प्रेमात पाडण्याचे प्रकार घडतात पण प्रेम हे दर्जेदार असावे. असा महत्त्वपूर्ण प्रेमाचा सल्ला चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात आयोजित इ. १० वीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा व निरोप समारंभात बोलत होते. यावेळी मंचावर माजी विधानसभा अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, संस्थेच्या अध्यक्ष सौ. पूनम गुजराथी, उपाध्यक्षा सौ. छायाबेन गुजराथी, वसंतलाल गुजराथी, मुख्याध्यापक सुनील पाटील, पर्यवेक्षक विजय पाटील, माजी मुख्याध्यापक सुनील चौधरी, संस्थेतील विविध विद्या शाखांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी इ. १० वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना जितेंद्र वलटे पुढे म्हणाले की, दहावीचे वर्ष हे आयुष्याच्या पायाभरणी वर्ष असते. त्यामुळे अभ्यासात कमी पडू नका. कुटुंबातल्या एकाचे शिक्षित होणे म्हणजे एक संपूर्ण कुटुंब उभं करणे होय. सध्याच्या काळात शिक्षणाचे व्यापारीकरण झालेय. ग्रामीण भागातील देखील शिक्षण महाग झालेय. अशावेळी ज्यांना सर्व सुविधा आहेत त्या शहरातील विद्यार्थ्यासोबत आपल्याला स्पर्धा करायची आहे हे विसरु नये. बाहेरच्या जगाशी स्पर्धा करतांना आई वडिलांचा त्याग, कष्ट आणि शिक्षकांचे तुमच्यासाठी असलेले प्रयत्न विसरु नका. शिक्षक आणि पालकांच्या स्वाभिमान, प्रतिष्ठेसाठी शिका.
याप्रसंगी वैष्णवी माळी, हर्षदा गवळी, साक्षी बोरसे या विद्यार्थिनींनी मनोगतातून शाळेविषयी भावना व्यक्त केल्या. तर संस्थेच्या अध्यक्ष सौ. पूनम गुजराथी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मागील वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शुभेच्छा व निरोप समारंभाचे सूत्रसंचालन व्ही. पी. महाले यांनी तर प्रास्ताविक सुनील पाटील यांनी व आभार प्रदर्शन संजय सोनवणे यांनी केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.