तंबाखू मुक्त शाळा कार्यक्रम - संजय बारी व अब्दुल हक यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव
चोपडादि.२६(प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग (जि. प. जळगाव), सलाम मुंबई फाऊंडेशन (मुंबई) , जन मानवता बहुद्देशीय संस्था (चोपडा), साने गुरुजी फाउंडेशन (अमळनेर), यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यात तंबाखू मुक्त शाळा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन अनेक जण तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर गेले आहेत. या कार्यक्रमात जिल्ह्यातील शिक्षकांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
चोपडा तालुक्यातील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयातील शिक्षक तथा तंबाखू मुक्त शाळा कार्यक्रमाचे प्रशिक्षक संजय बारी व मुस्तफा अँग्लो हायस्कुलमधील शिक्षक अब्दुल हक शेख अय्युब यांनी या कार्यक्रमात केलेल्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा नुकताच जळगाव येथे सन्मान करण्यात आला. दोन्ही शिक्षकांनी शाळा व तालुका प्रशासनाच्या मदतीने जनजागृतीपर विविध उपक्रम राबविले आहेत. यावेळी तत्कालीन गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांचाही गौरव करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शिक्षणाधिकारी विकास पाटील, कल्पना चव्हाण ,राकेश कासारे (जिल्हा प्रतिनिधी सलाम मुंबई फाऊंडेशन), जन मानवता बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजमोहम्मद शिकलकर, साने गुरूजी फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे उपस्थित होते. चोपडा तालुक्यातील या दोन्ही शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.