आदिवासी पाड्यावरही दिवाळीचा वाढला गोडवा ; चोपडा रोटरीचा उपक्रम
चोपडा दि.29(प्रतिनिधी)- एकीकडे शहरांमध्ये दिवाळीची धुमधाम असते. आकर्षक रोषणाई , फटाक्यांची आतिषबाजी, घराघरांतून दिवाळीच्या फराळाचा खमंग वास दरवळत असतो अशावेळी मात्र दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावर बऱ्याचदा विजेचा प्रकाशही नसतो. तर कधी गोडधोड पदार्थही नशिबी नसतात. दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या दिवाळीचा गोडवा वाढावा यासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे तालुक्यातील आदिवासी भागातील उत्तमनगर या पाड्यावर दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.
रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष रोटे. डॉ. ईश्वर सौंदाणकर, प्रकल्प प्रमुख अरुण सपकाळे व सहसचिव संजय बारी तसेच उत्तमनगरचे पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत उत्तमनगर या आदिवासी गावातील सर्व कुटुंबांमध्ये दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी या पाड्यावरील मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. रोटरी क्लबच्या अनेक सदस्यांनी घेऊन केलेल्या आर्थिक सहकार्यातून हा प्रकल्प राबविण्यात आला. रोटरी क्लब ऑफ चोपडा गेल्या अनेक वर्षापासून हा प्रकल्प राबवत असून दुर्गम भागातील आदिवासी बांधवांमध्ये आनंदाची पेरणी करत आहे.