एका छंदी शिक्षकाचा असाही उपक्रम..सोशल मीडियातून घडवले गडकोटवरील गणेशांचे दर्शन

 एका छंदी शिक्षकाचा असाही उपक्रम..सोशल मीडियातून घडवले गडकोटवरील गणेशांचे दर्शन


गणपूर(ता चोपडा)ता 17: महाराष्ट्रातील गडकोट ही इतिहास प्रेमी मावळ्यांसाठी जणू पंढरीच. आणि या गडकोटांवरील देवदेवतांची मंदिरे जणू या मावळ्यांची विठ्ठल रुक्मिणी. असेच एक दुर्गाभ्यासक  आणि शिक्षक पंकज शिंदे यांनी  गणेशोत्सवात विविध गडकोटांवरील श्रीगणेशाचे दर्शन सर्वांना घडावे या उद्देशाने 'गडकोटांवरील श्री गणेश' या नावाने  व्हाट्सअप द्वारे फोटोसह माहिती टाकली आणि ती हजारावर गणेशप्रेमींपर्यंत पोहचवली. या गणेशोत्सव काळात दररोज एक एक गडावरील श्री गणेशाच्या प्रतिमेचा फोटो आणि त्याची माहिती जिल्ह्यातील आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर आणि मित्रांना वैयक्तिक त्यांनी  पाठवली.त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक गणेश भक्तांना घरबसल्या या दुर्गम अति दुर्गम भागातील गडकिल्ल्यांवरील श्री गणेशाचे दर्शन  मिळाले. म्हणून अनेक गणेश भक्तांनी त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही केले.

              ते चोपडा येथील प्रताप विद्या मंदिर शाळेत शिक्षक असून  ऐतिहासिक वस्तू आणि वास्तूंचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्याचा वसा त्यांनी घेतला आहे. जवळपास दहा वर्षांपासून दुर्ग संवर्धनासाठी ते विविध संस्थांसोबत काम करत आहेत. किल्ले चौगावच्या इतिहासाला उजेडात आणण्यासाठी आणि त्याला शासन दरबारी मान्यता मिळण्यासाठी अनेक वर्षांपासून ते प्रयत्नशील आहेत. किल्ले चौगाव सोबतच महाराष्ट्रभरातील इतर गडकोटांवर ते दुर्ग संवर्धनाच्या मोहिमांवर ते जातात. सोबतच खानदेशातील ऐतिहासिक वारसा असणाऱ्या  बारव संवर्धनासाठी देखील ते कार्यरत आहेत.त्यांच्या या गणेशोत्सव काळातील उपक्रमात त्यांनी साताऱ्यातील सुंदरगड,राजगडावरील सुवेळा माचीवरील गणपती,कुलाबा किल्ल्यावरील गणेश पंचायत,भोरगिरी किल्ल्यावरील गणेश,हरिश्चंद्र गडावरील गणेश,कोकणातील किल्ले रामगड,अर्नाळा येथील गणेश अश्या अनेक गडावरील गणेशांची माहिती त्यांनी भक्तांपर्यंत पोहचवली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने