केशवस्मृती प्रतिष्ठान, भगिनी मंडळ व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने चोपड्यात १४ ला भुलाबाई महोत्सव

 

केशवस्मृती प्रतिष्ठान, भगिनी मंडळ व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने चोपड्यात १४ ला भुलाबाई महोत्सव

चोपडा दि.४(प्रतिनिधी)- नव्या पिढीला माहित नसणाऱ्या आपल्या संस्कृतीच्या अस्सल खुणा असणारी लोकगीते, लोकनृत्य व लोककला यांचे संवर्धन आणि विकसन व्हावे तसेच नव्या पिढीवर हे संस्कार व्हावे, या हेतूने चोपडा येथे केशव स्मृती प्रतिष्ठान (जळगाव), भगिनी मंडळ (चोपडा) व इनरव्हील क्लब (चोपडा) यांच्या संयुक्त विद्यमाने १४ सप्टेंबर रोजी भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

       येथील भगिनी मंडळाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित सहविचार सभेमध्ये याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. याप्रसंगी मंचावर भगिनी मंडळाच्या अध्यक्ष पूनम गुजराथी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष डॉ. वैशाली सौंदाणकर व केशवस्मृती प्रतिष्ठानच्या प्रीती झारे या उपस्थित होत्या. सहविचार सभेचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी तर आभार प्रदर्शन भावेश लोहार यांनी केले. सहविचार सभेसाठी तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच इनरव्हील क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या.

        या भुलाबाई महोत्सवात भुलाबाई विषयक पारंपारिक लोकगीते, लोकनृत्य सादर केली जाणार असून त्यातून सामाजिक संदेश दिला जाणार आहे. यातील विजेत्या गटांना स्मृतिचिन्ह व पारितोषिके दिली जाणार आहे. हा महोत्सवात बालवाडी ते चौथी, पाचवी ते दहावी व खुला असे तीन गट असणार आहेत. प्रत्येक संघाला रंगमंच व्यवस्थेसह सादरीकरणासाठी पाच मिनिटांचा कालावधी दिला जाईल. महोत्सवात स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक भावेश लोहार व इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली सौंदाणकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. आयोजनासाठी मुख्याध्यापक एस. बी. पाटील यांच्यासह पर्यवेक्षक व्ही. डी. पाटील शिक्षक व्ही. यू. पाटील, व्ही. पी. महाले यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने