जाणीवा, निरीक्षण आणि अनुभवांची घुसळण म्हणजे 'मन मंथन'

 जाणीवा, निरीक्षण आणि अनुभवांची घुसळण म्हणजे 'मन मंथन' 

 

 'आपल्या मनात आणि समाजमनातही या कविता संग्रहाचे सदैव मंथन होत राहो', अशी अपेक्षा करत आयुष्यात आलेल्या अनेकांना हे पुस्तक अर्पण  करणाऱ्या चोपडा येथील निवृत्त कलाशिक्षक श्री. एस. एच. पाटील यांच्या 'मन मंथन' या कवितासंग्रहाच्या रूपातील दुसऱ्या पुस्तकाचे स्वागत करताना त्यांच्यासह त्यांच्या गोतावळ्यात आनंदाचे भाव आहेत.

        जळगावच्या प्रशांत पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या कविता संग्रहातील प्रताप महाविद्यालयाचे तत्त्वज्ञान विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख प्रा. डी. डी. पाटील यांची चिंतनात्मक प्रस्तावना या कविता आत्मबोधात्मक व आत्मदर्शी असल्याचे सांगते. प्रताप महाविद्यालयाचेच माजी प्राचार्य डॉ. श्री. एल. ए. पाटील यांच्या आत्मीयतेने भिजलेल्या नेमक्या शब्दातील शुभेच्छा कवीसाठी नक्कीच प्रेरक आहेत. 

        अनेक तात्कालीक संदर्भ असणाऱ्या दैनंदिन जगण्यातील विविध छटा दर्शवणाऱ्या विविध आशय, भाव, संस्कारांनी युक्त सुमारे ६९ कविता या 'मन मंथन' कविता संग्रहात आहेत. शाळा, निसर्ग, शेती - शेतकरी, प्राणी - पक्षी, कोरोना, सण, उत्सव,  आत्महत्या, राजकारण, राष्ट्रभक्ती, दोन पिढ्यांमधील दरी, चिंतन, अध्यात्म असे कुठलेही विषय वर्ज्य नसणाऱ्या या संग्रहात कवीने आपल्या जाणीवा, निरीक्षणे आणि अनुभवांना कवितेच्या रुपात स्थान देत शब्दबद्ध केले आहे. या संग्रहातील कवितांमध्ये कुठेही वृत्त, छंद, अलंकार यासाठी फारसा आग्रह नसला तरी प्रत्येक कवितेत यमक साधत कवीने कवितेचा साचा जपला आहे. प्रत्येक कवितेच्या अंतिम ओळीची पुनरुक्ती, ही त्या कवितेचा आशय दृढ करण्यासाठी असल्याचे स्पष्टपणे जाणवते.  'मन मंथन' मधील काही कविता अर्थगर्भ तर काही अंतर्मुख करणाऱ्या आहेत. विज्ञानवादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या कविता आहेत तशाच ईश्वराप्रती श्रद्धा व्यक्त करणाऱ्याही कविता यात आहेत. प्रौढ मनाची व्यथा इथे आहे तशीच बालमनाची मस्ती आणि भाबडेपण आहे. माणसातील वैगुण्ये आहेत तसेच मानवी मनाच्या संवेदना आहेत. कर्तृत्ववान स्त्रियांचे स्मरण आहे. कोरोनाच्या दुःखद भयावह आठवणींसोबत त्यावेळचा सेवाभाव देखील आहे. 

    मनुष्याचा जन्म ही अमूल्य देणगी मानली जाते पण या जन्मात आपल्या हातून बऱ्याच वेळा कळत नकळत चुका घडतात, अनेक दुर्गुण आपल्याला चिकटतात हे कवी प्रामाणिकपणे मान्य करतो व या दुर्गुणांची होळी व्हावी असा सच्चा भाव 'कसे जाळणार दुर्गुण' या कवितेतून कवी व्यक्त करतो. 

      काळाच्या ओघात सेवेचे, कामाचे आणि जगण्याचे संदर्भ बदलले आणि त्यात माणूसपण हरवले आहे ही जाणीव स्पष्टपणे झाल्याने 'माणूस भेटेल का?' असा प्रश्न थेट देवालाच या कवितेतून विचारला आहे. 

  'तेव्हा वाटले मलाही कवींचे स्वतंत्र गाव असावे' या ओळीतून कवीच्या वाट्याला येणारे दुःख, अवहेलना 'व्यथा कवीची' या कवितेतून मांडले आहे. पण अशा कवींच्या स्वतंत्र गावात कवींना उत्स्फूर्त दाद मिळेल, हा आशावादही याच कवितेत व्यक्त केला आहे. 

       संसाररथाची दोन चाके असणाऱ्या पती-पत्नीपैकी एकाच्या वियोगानंतर जगण्यातील चैतन्य हरपते, हे वास्तव 'तुटलेले चाक' या कवितेतून मांडताना कवी भावूक झाल्याचे चटकन जाणवल्याशिवाय रहात नाही. असाच काहीसा भाव 'औक्षण' या कवितेतही जाणवतो. 

      अगदी सोप्या शब्दात शेजारील राष्ट्र पाकिस्तानची विदारक सद्यस्थिती 'खरे बोल' या कवितेतून मांडून मातृभूमीबद्दल प्रेम जागवले आहे. 

       '.... इस्त्री फिरवली कपड्यांवर म्हणून चेहरा चिकणा होत नाही' या ओळींमधून जगण्यातील बेगडीपण दाखवण्याचा प्रयत्न कवीने 'चटका' या कवितेत केला आहे. 

        हिंदी सिनेसृष्टीत १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि तुफान गाजलेल्या 'शोले' चित्रपटातल्या ठाकूर आणि गब्बर या व्यक्तिरेखांना समोर ठेवून कवीने जगण्यातील कर्माला महत्त्व देताना '.... अन् अत्याचारी गब्बरपेक्षा सदाचारी ठाकूर बरा' ओळीमधून माणसाचे मन, मस्तक आणि मनगट (हात) हे चांगल्या कामासाठीच असावेत हे सोप्या भाषेत 'ते हात काय कामाचे' या कवितेतून सुचवले आहे. 

         अक्षरांचे काव्य अर्थात परीवर्णी काव्य (ॲक्रॉस्टिक) प्रकारात मोडणारी एक कविताही यात वाचण्यास मिळते ज्यात ज्या शाळेत कवीने कलाशिक्षक म्हणून सेवा दिली त्या शतकोत्तर शाळेचा 'सद्गुणांची खाण तू' म्हणत उल्लेख केला आहे. 

         प्रबोधन, चिंतन, आत्मपरीक्षण, सांत्वन, प्रोत्साहन, मानवी स्वभावातील व्यंग, चिमटे अशा अंगाने जाणारी कविता या संग्रहात वाचायला मिळते. कुठेही अवजड शब्दांची योजना करत कविता गहन करण्याऐवजी सहज, सुगम शब्दात चार ओळींच्या कडव्यांमध्ये कवीने विविध विषयांवर आपले विचार व्यक्त केले आहेत. श्री. एस . एच. पाटील यांच्या या काव्य संग्रहानिमित्त त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेतर्फे अनेकोत्तम सदिच्छा..... 

शब्दांकन-- संजय रघुनाथ बारी 

प्रमुख कार्यवाह,(महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा - चोपडा) भ्रमणध्वनी - ९४२०० ८४८२३

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने