शिवकालीन नाणी व शस्त्रे पाहून महिला मंडळ शाळेची मुले भारावली

 शिवकालीन नाणी व शस्त्रे पाहून महिला मंडळ शाळेची मुले भारावली 

चोपडा,दि.३(प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात भरवण्यात आलेल्या अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनात चोपडा येथील भगिनी मंडळ संचलित महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह साहित्य संमेलनातील विविध प्रदर्शनांना भेट देत माहिती जाणून घेतली. दुर्मिळ अशी शिवकालीन नाणी व शिवकालीन शस्त्रे बघून विद्यार्थी भारावले तसेच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्यात कुतूहल निर्माण झाल्याचे स्पष्टपणे जाणवले.

       या साहित्य संमेलनास महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे सुमारे २४० विद्यार्थी व १३ शिक्षक सहभागी झाले होते. प्रत्येक इयत्तेच्या शालेय अभ्यासक्रमात इतिहासाच्या साधनांचा अभ्यास समाविष्ट असल्याने तीच इतिहासाची साधने प्रत्यक्ष बघायला मिळाल्याने विद्यार्थी अधिक प्रभावित झाले व कुतूहलापोटी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारुन माहितीची नोंद करत संकलन केले. नाणी प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, वीरगळ प्रदर्शन, आरमार प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, शूरवीरांची समाधी प्रदर्शन यासारख्या विविध कक्षांना विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह भेट देत माहिती जाणून घेतली. तसेच साहित्य संमेलनातील दोन सत्रांनाही उपस्थिती देत वक्त्यांची मनोगते ऐकली. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते व मालोजीराजे भोसले यांच्या वंशजांची भेट घेऊन त्यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. तसेच जळगाव शहरातील महात्मा गांधी उद्यानाला भेट देऊन तेथील 'मोहन ते महात्मा' या प्रदर्शनातील दुर्मिळ माहिती जाणून घेतली.

      विद्यालयाचे पर्यवेक्षक विजय पाटील, शिक्षक संजय बारी, चंद्रकांत चौधरी, अनिल महाजन यांच्या नेतृत्वाखाली भावेश लोहार, वनराज महाले, प्रशांत चव्हाण, विजय पाटील, सागर चौधरी, दिनेश चौधरी, कविता पाटील, यशोदा ठोके व मदतनीस मधुकर साळवे यांनी याकामी परिश्रम घेतले. या क्षेत्रभेटीसाठी मुख्याध्यापक सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने