विविध प्रकल्पांच्या शुभारंभाने रोटरी वर्षाची यशस्वी सांगता

 विविध प्रकल्पांच्या शुभारंभाने रोटरी वर्षाची यशस्वी सांगता 


चोपडादि.२(प्रतिनिधी) - रोटरी या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचे वर्ष जुलै ते जून असे असल्याने दि. ३० जून रोजी वर्ष २०२३-२४ ची जगभरात सांगता होत असते. येथील रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया, सचिव अर्पित अग्रवाल यांच्या कार्यकाळाची सांगता वर्षाच्या अखेरच्या दिवशी विविध प्रकल्पांच्या शुभारंभाने करण्यात आली. याप्रसंगी भावी प्रांतपाल रोटे. ज्ञानेश्वर (नाना) शेवाळे व चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

        काल झालेल्या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने रोटरी भवनमधील ॲकॉस्टिक सुविधेचा शुभारंभ, कस्तुरबा विद्यालयामागील अमरधाम येथे विसाव्याचे लोकार्पण, धरणगाव रोडवरील रामगोपाल गोशाळेच्या शेडचे उद्घाटन तसेच धरणगाव नाक्यावरील 'आय लव्ह चोपडा' या शहराविषयी प्रेम व आत्मीयता दर्शविणाऱ्या अक्षर फलकाचे अनावरण करण्यात आले. तर सायंकाळी झालेल्या डिनर मीट मध्ये रोटे एम डब्ल्यू पाटील, आशिष गुजराथी, नितीन अहिरराव, रुपेश पाटील, पंकज बोरोले, लीना पाटील व रोट्रॅक्टर अनिल बाविस्कर यांनी गतवर्षात झालेल्या विविध समाजोपयोगी प्रकल्पांच्या योग्य अंमलबजावणीबद्दल अध्यक्ष चेतन टाटिया, सचिव अर्पित अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. चेतन टाटिया यांनी वर्षभराच्या कामकाजाचा आढावा सादर करत सहकार्याबद्दल सर्वांचे भावपूर्ण शब्दात आभार व्यक्त केले. या बैठकीचे संचालन संजय बारी यांनी तर आभार प्रदर्शन अर्पित अग्रवाल यांनी केले. 

        याप्रसंगी रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष चेतन टाटिया, सचिव अर्पित अग्रवाल, खजिनदार पवन गुजराथी यांनी अनुक्रमे नूतन अध्यक्ष डॉ. ईश्वर सौंदाणकर, सचिव भालचंद्र पवार, खजिनदार मनोहर पाटील यांच्याकडे पदभार सोपवला. तर रोटरी सेवा संस्थेचे मावळचे अध्यक्ष आशिष गुजराथी, उपाध्यक्ष अशोक जैन, खजिनदार अनिल अग्रवाल यांनी अनुक्रमे नूतन अध्यक्ष एम. डब्ल्यू. पाटील, उपाध्यक्ष विलास एस. पाटील व खजिनदार पवन गुजराथी यांच्याकडे पदभार सोपवला. आनंदराज पॅलेस येथे झालेल्या या कार्यक्रमास रोटरी सदस्य व त्यांचे परिवारजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने