प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी यांनी “२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ७१ विद्यार्थ्यांना मिळवून दिली ३४ लाख १५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती

प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी यांनी “२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ७१ विद्यार्थ्यांना मिळवून दिली ३४ लाख १५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती 

♦️कुठल्याही फळाची अपेक्षा न करता प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी यांचे निस्वार्थी कार्य”

♦“२५ वर्षात ४१५ गरजू व हुशार विद्यार्थ्यांना मिळवून दिली अमेरिकेतील अनिवासी भारतीयांची १ कोटी ४५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती”

शिंदखेडा,दि.२०(प्रतिनिधी):अमेरिकेतील फाउंडेशन फॉर एक्सलन्स या संस्थेतर्फे आजवर ४१५ पेक्षा अधिक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सुमारे १ कोटी ४५ लाख रुपये तसेच २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ७१ विद्यार्थ्यांना ३४ लाख १५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून देणारे शिंदखेडा येथील एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अंगभूत गुणवत्ता असूनही आर्थिक बाजू कमकुवत असल्याने संधीपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे, या हेतूने उद्योगपती प्रभू गोयल, कनवाल रेखी, एस. एल. भामरे यांच्यासह अमेरिकेतील काही अनिवासी भारतीयांनी अमेरिकेत फाउंडेशन फॉर एक्सलन्स ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेतर्फे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात भारतातील १६,२९५    विद्यार्थ्यांना ७५ कोटी ७९ लाख रुपये एवढी शिष्यवृत्ती दिली गेली.

संस्थेने प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी यांचे कडे महाराष्ट्रातील समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे. संस्थेतर्फे भारतातील विविध ठिकाणाहून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले जातात. त्यात ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखापेक्षा कमी आहे, तसेच ज्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत ७० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त तसेच सीईटी परीक्षेत १४० पेक्षा अधिक गुण प्राप्त व एमएचटी-सीईटी परीक्षेत गुणवत्ता यादीत ६००० च्या आत aस्थान मिळवणारे किंवा नीट परीक्षेत प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात.

व्यावसायिक अभ्यासक्रमातील B.E./B.Tech, Integrated 5 Yr. Duel Degree M. Tech, M.B.B.S., B. Pharm and 5 Yr. Integrated Law या शाखेच्या प्रथम वर्षातील पात्र विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते. जर प्रथम वर्षात शिष्यवृत्ती मिळाली व विद्यार्थ्याने आपली प्रगती कायम ठेवली तर त्या विद्यार्थ्याचे उच्च शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरवर्षी ही शिष्यवृत्ती मिळत असते. दरवर्षी साधारणपणे ४० ते ६० हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती मिळते. अशा रीतीने आपल्या परिसरातील शेकडो विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून उच्च शिक्षण पूर्ण करून डॉक्टर, इंजिनिअर तसेच परदेशात आय.टी. क्षेत्रात मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. संस्थेच्या www.ffe.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळू शकते. पात्र विद्यार्थी दरवर्षी ३१  डिसेंबर पर्यंत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज दाखल करू शकतात.

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी यांनी अमेरिकेतील फाउंडेशन फॉर एक्सलन्स या संस्थेतर्फे ७१ विद्यार्थ्यांना ३४ लाख १५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून दिली. त्यासाठी संस्थेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या परिसरातील निकष पात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे ऑनलाईन पद्धतीने मुलाखती घेऊन गरीब व हुशार अशा ७१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४० ते ६० हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळवून दिली. त्यात M.B.B.S. चे २२ विद्यार्थी, B.E./ B.Tech चे ४० विद्यार्थी, Law चे ५ विद्यार्थी, B.Pharm चे २ विद्यार्थी, M.Tech चे २ विद्यार्थी आहेत.

प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी ३१ मे २०२० रोजी शिंदखेडा महाविद्यालयात प्राचार्य पदी असताना सेवानिवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या तीन वर्षाच्या प्राचार्य पदाच्या कार्यकाळात विद्यार्थी उपयोगी असे अनेक उपक्रम राबविलेत. त्यामुळेच अतिशय अल्पकाळात त्यांची शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून ओळख निर्माण झाली. त्यापूर्वी ते झेड. बी. पाटील महाविद्यालय धुळे, येथे ३४ वर्ष प्राध्यापक व दहा वर्षे उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते.

प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी हे संगीत विशारद असून, शास्त्रीय गायन, हार्मोनियम व कॅसिओ वाद्य वाजवणे हे त्यांचे छंद आहेत. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे. आतापर्यंत त्यांनी ६ पेटंट्स मिळवले आहेत. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून त्यांचे ७९ शोधनिबंध प्रसिद्ध आहे. त्यांनी २२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध वाचन व अनेक परिषदांमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून काम केलेले आहे. त्यांची रसायनशास्त्राची एकूण ३४ पुस्तके निराली प्रकाशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. अजूनही त्यांचे पुस्तक लेखन चालू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. पदवी प्राप्त केली आहे.

समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात कसा देता येईल याकडे डॉ. बी. आर. चौधरी कटाक्षाने बघतात. म्हणूनच सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांचे हे निस्वार्थी कार्य सुरू आहे. भविष्यातही असे कार्य निरंतर करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळेच त्यांच्या चौकटी बाहेरील कामांची दखल घेत आतापर्यंत त्यांना प्रतिष्ठित आठ पुरस्कार मिळाले आहेत. त्यात:

१) क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा "आदर्श शिक्षक" पुरस्कार (२०१७)

२) शा.मा. चव्हाण प्रतिष्ठान, धुळे यांचेकडून "आदर्श प्राचार्य" पुरस्कार (२०१८)

३) सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचा "उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी" पुरस्कार (१९८८-८९)

४) पाणी फाउंडेशनतर्फे "जलरत्न पुरस्कार" (२०१८)

५) पालक विकास असोसिएशन धुळे मार्फत नाशिक विभागीय स्तरावरील "गुरु गौरव" पुरस्कार

६) आंतरराष्ट्रीय परिषदेत "बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड" (२०१६) ७) राष्ट्रीय परिषदेत बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड (२०१५)

८) महाराष्ट्र गाडी लोहार समाज मंडळ कल्याण, मार्फत नॅशनल अवॉर्ड पुरस्कार (२०१९)

या वैशिष्ट्यपूर्व कामगिरीबद्दल प्राचार्य डॉ. बी. आर. चौधरी यांचे माजी मंत्री मा. दाजीसाहेब रोहिदास पाटील, एस. एस. व्ही. पी. एस. संस्थेचे अध्यक्ष व आमदार बाबासो कुणाल पाटील, मा. प्रफुल्ल कुमार सिसोदे, मा. डॉ. एस.टी. पाटील, मा. अशोक बापू पाटील, भाऊसो सुरेश पाटील, प्रशासकीय अधिकारी भाऊसो प्रमोद पाटील, जयहिंद संस्थेचे चेअरमन आबासो विजय पितांबर पाटील, माजी चेअरमन डॉ. अरुणराव साळुंके, व्हा. चेअरमन बाळासो चंद्रशेखर पाटील, सेक्रेटरी प्रा. शरद बच्छाव, मा. मोहन मोरे  व सर्व संचालक मंडळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांची प्रशंसा केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने