आई जर घराचं तोरण असेल तर बाप हा त्या घराचं धोरण ..कवी अशोक सोनवणे

 

आई जर घराचं तोरण असेल तर बाप हा त्या घराचं धोरण ..कवी अशोक सोनवणे

चोपडा दि.१८(प्रतिनिधी)- वृद्धाश्रमांची संख्या ही मुलं आणि पालक यांच्या नात्यातील निर्माण होत असलेल्या दुराव्याचे सूचक आहे. असे असले तरी साहित्यात दुर्लक्षित असलेला बाप हा अनेकांनी आपल्या कवितेतून प्रभावीपणे रेखाटला आहे. आई जर घराचं तोरण असेल तर बाप हा घराचं धोरण आहे, असे सांगत ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्ष कवी अशोक सोनवणे यांनी आपली 'सतरा पत्रे' ही बापलेकाच्या नात्याची कविता सादर करत काव्य मैफलीची सांगता केली.
जागतिक पितृ दिनानिमित्त रोटरी क्लब, चोपडा व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पितृ काव्य वंदना' या काव्य मैफलीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी हरेश्वर कॉलनीतील रोटरी भवनातील मंचावर रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया, सचिव रोटे. अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख रोटे. डॉ. ललित चौधरी, मसापचे कार्याध्यक्ष रोटे. विलास पी. पाटील, प्रमुख कार्यवाह रोटे. संजय बारी हे उपस्थित होते.
'पितृ काव्य वंदना' या मैफलीत रमेश जे. पाटील, रेखा पाटील, चेतन टाटिया, शां. हि. पाटील, डॉ. अविनाश कचरे, ए. पी. पाटील, पंकज शिंदे, विलास पी. पाटील यांनी वडीलांविषयी भाव प्रकट करणाऱ्या स्वरचित कविता सादर केल्या. तर तुषार लोहार, अर्पित अग्रवाल, प्रभाकर महाजन, प्रा. किशोर पाठक, जयश्री पाटील - चव्हाण, वैद्य शैलेंद्र महाले, संजय बारी यांनी बाप विषयक संकलित कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मैफलीचे निवेदन संजय बारी यांनी तर आभार प्रदर्शन अर्पित अग्रवाल यांनी केले. बापाविषयी विविध भावना शब्दातून मांडणाऱ्या या मैफलीला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने