जिल्ह्यात सर्पदंशाने चार महिन्यात २३ जणांचा मृत्यु...सर्पदंशावर वेळीच घ्या वैद्यकीय उपचार !अंधश्रध्दा बाळगू नका
जळगाव, दि.२७ सप्टेंबर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सर्पदंशामुळे मागील चार महिन्यात 23 जणांचा मृत्यु झाला आहे. तर 13 जण किरकोळ जखमी आहेत. तेव्हा सर्पदंशावर वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे. सर्पदंश झाल्यावर तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते व ती मिळण्यापूर्वी केलेले उपचार म्हणजेच प्रथमोपचार होय. आतापर्यंत बऱ्याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच किती तरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. सर्पदंशावर वैद्यकीय पथकांच्या मदतीने उपचार करावेत. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सर्प घरात येऊ नये, सर्पदंश टाळता यावे म्हणून पंचसूत्री -
1) परिसर स्वच्छ ठेवा, अडगळ काढून टाका, अनावश्यक झुडुपे वेली काढून टाका किंवा छाटणी करा, उष्टी खरकटी परिसरात टाकू नका त्या मुळे परिसरात उंदीर येणार नाही .
2) ड्रेनेज पाईप च्या गटाराकडील बाजूला जाळी बसवा जेणेकरून त्या द्वारे साप घरात येणार नाही.
3) खळ्यात ,गोठ्यात, शेतात वावरतांना लांब काठी बाळगा , कडबा ,चाऱ्यात एकदम हात घालू नका गोवऱ्या , लाकडे काढताना सावधानता बाळगा.
4) अंगण, घरातील बिळे दरवाज्यांच्या चौकटीतील फटी व्यवस्थित बुजवून टाका
5) मण्यार सारखे विषारी साप निशाचर आहेत त्यामुळे रात्री जमिनीवर झोपणे टाळा, रात्री बाहेर जातांना , शेतात वावरताना, हातात टॉर्च पायात बूट घालायला विसरू नका.
सर्पदंश झाल्यास प्रथमोचार
1) सर्पदंश झाल्यास घाबरून जाऊ नये, सर्वप्रथम वैद्यकीय उपचार लवकरात लवकर कसा मिळेल त्या साठी प्रयत्न करावे. रुग्णास धीर द्यावा त्याला जास्त हालचाल करू देऊ नये
2)जखम स्वच्छ पाण्याने धुवावी सर्पदंश झालेल्या भागाच्या वरच्या बाजूला आवळ पट्टी बांधून दर 5,10 मिनिटांनी ती सैलं करून परत बांधावी.
3) चिरा देऊ नये, सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नये.
4) कोणताही सर्प असो जर त्याचा दंश झाला तर तत्काळ सिव्हील हॉस्पिटल किंवा जवळच्या रुग्णालयात दाखल झाले पाहिजे.
सर्पदंशाच्या अंधश्रध्दांवर विश्वास ठेवू नये –
साप कधीही तुम्हाला स्वतःहून पूढे येऊन चावत नाही , साप डूख धरत नाही, सापाला आपल्या सारखी तीक्ष्ण दृष्टी नसते, त्याला हात ,पाय, बाह्यकान देखील नसतात कुणाचा चेहरा लक्षात राहील इतका त्याचा मेंदू तल्लख नाही म्हणून कोणताच साप बदला घेत नाही.
साप चावला म्हणजे मृत्यू नाही प्रत्येक साप विषारी नसतो आणि विषारी सर्पदंश झाला तरी योग्य वेळेत योग्य वैद्यकीय उपचार केले तर रुग्ण 100% वाचतो.
सर्प मित्रांसाठी सूचना -
सर्पमित्रांनी साप वाचवल्यावर उपस्थित जनसमुदायास सर्प अंधश्रद्धाबद्दल जागृत करून वैद्यकीय उपचाराचे महत्त्व समजावून त्या बाबत मार्गदर्शन करावे. सोशल मीडियावर प्रसिध्दी साठी सपासोबत स्टंट किंवा फोटो सेशन व्हिडिओ बनवू नये. घरात सर्प संग्रह करू नये. जनजागृती करतांना जीवंत सापांचे प्रदर्शन करू नये . नागरिक स्वतःचा आणि सापाचा जीव वाचवण्यासाठी सर्पमित्रांना कॉल करतात. अशावेळी पेट्रोल चार्ज च्या नावाखाली अवास्तव रक्कम मागू नका. सर्प वाचवणे आपले कर्तव्य आहे. पण रिकामे धाडस करू नये स्वतःचा जीव वाचवणार तरच सर्प वाचवता येतील असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेने केले आहे.