चोपडा महाविद्यालयात आई-बाबा आपल्या महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न
चोपडा,दि.२३(प्रतिनिधी) महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे (पालक मेळावा) आई-बाबा आपल्या महाविद्यालयात कार्यक्रम दि.21/09/2023 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी. ए.सुर्यवंशी सर यांनी भूषविले स्व. दादासाहेब डॉ सुरेश जी पाटील व स्व. आक्कासाहेब शरचंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सूरवात करण्यात आली,
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील,चोपडा महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन एस कोल्हे सर, समन्वयक डॉ. शैलेश वाघ सर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सी आर देवरे सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्यात आला. आई - बाबा आपल्या महाविद्यालयात या कार्यक्रमासाठी जवळजवळ 110 पालकांनी आपला सहभाग नोंदवला व महाविद्यालयाला भेट दिली व कार्यक्रमाप्रसंगी अनेक आई-वडिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. सी आर देवरे यांनी आपल्या प्रास्तविकामध्ये महाविद्यालयाची सर्व यशोगाथा सांगताना नॅक चा अ + दर्जा, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, दरवर्षी गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थी, कॅम्पस इंटरव्यू दरम्यान झालेली प्लेसमेंट, सी ए परिक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, विभागाचा यशस्वी निकाल,विद्यार्थ्यांची वाढती आकडेवारी, NEP चा परिणाम, वरिष्ठ व्यवस्थापनाची विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शिस्त व महाविद्यालयाची प्रगती यासंदर्भातील काळजीपूर्वक आढावा, विभागाचा पुढील रोडमॅप व वाणिज्य विभागाचे सुरू होणारे संशोधन केंद्र या संदर्भातील विभागाची व महाविद्यालयाची उद्दिष्टे पालकांसमोर मांडली.
तसेच विद्यार्थ्यांना सुसंस्कृत बनवण्याची जबाबदारी ही फक्त पालकांची नाही तर विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षकांची सुद्धा आहे. त्या दोघांनी मिळून विद्यार्थी घडवायचा आहे असे महाविद्यालयाचे समन्वयक डॉ शैलेश वाघ यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य श्री.एन.एस.कोल्हे यांनी आजची बदलती शिक्षण पद्धती व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांची त्या संदर्भातील जबाबदारी व भविष्यातील आव्हाने या संदर्भात मार्गदर्शन केले.दरम्यान शिक्षकांमधून श्री.सी.पी.बाविस्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी पालक व शिक्षक यांच्यात चर्चासत्र ठेवण्यात आले.यात पालकांनी आपल्या पाल्याची हजेरीपत्रक,वागणूक,प्रगती याबद्दल विचारपुस केली व शिक्षकांशी संवाद साधला व नेहमी अशा प्रकारे पालक सभा घेवून विद्यार्थी ,पालक व शिक्षक संवाद घडवून आणावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
पालकांनी महाविद्यालयातील लायब्ररी,जिमखाना,विविध विभाग व सर्व कॅम्पसला भेट देवून अनेकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिस.अश्विनी जोशी मॅडम तर आभार सौ.हर्षा देवरे मॅडम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी.कॉम.चे अनेक विद्यार्थी स्वयंसेवक व मिस.कोमल पाटील यांनी मदत केली.