चोपड्यात समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांच्या माणूसकीच्या कार्याचा" जयजयकार"..तपासणीस आलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भेट दिले २५ ताट
चोपडा दि.२५ (प्रतिनिधी):शहरातील मिलिंद वसतीगृहात तपासणीसाठी आलेल्या समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी गरजू विद्यार्थ्यांना पुरेसे ताट नसल्याचे लक्षात येताच खिशातील पदरमोड करून २५ ताट लागलीच मागवून वसतिगृहास भेट दिल्याने कर्मचारी वृंद भारावून गेल्याच्या ह्रदय स्पर्शी प्रसंगाने माणुसकीचे दर्शन घडले.
काल चोपडा शहरातील मिलिंद वसतीगृह,सावता माळी,श्री संत गाडगेबाबा आणि महात्मा फुले वसतिगृह येथे प्रशासकीय कामाचा भाग म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, समाज निरिक्षक व्ही.टी.बाविस्कर व समाज कल्याण निरिक्षक भरत चौधरी, पवार आदी तपासणीसाठी आले असता त्यांना अचानक विद्यार्थ्यांना ताट अपूर्ण असल्याचे लक्षात आले.लागलिच समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी आपण अधिकारी असल्याचे बाजूला ठेवत गरजवंत विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आले . खिशातील पदरमोड करून त्वरित २५ ताट वसतिगृहास भेट दिले.आपणही हलाखीच्या परिस्थितीतून अत्यंत खडतर जीवन प्रवास करीत यशाचा उंबरठा गाठला आहे हे आठवत.तोच दूर्दैवी प्रसंग आज गरिब विद्यार्थ्यांवर ओढवत असल्याचे ध्यानी घेऊन त्यांच्यातली माणूसकी उफाळून आली व विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून गेले.खरं तर आजमितीस हजारों अधिकारी मदमस्त जीवनात व्यस्त आहेत पण बोटावर मोजण्या इतके समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांच्या सारखे अधिकारी यास आजही कार्यरत असल्याने माणूसकीचा ओढा ओसंडून वाहत असल्याचे चित्र आजही अनेकांना पाहावयास मिळते. त्यांच्या या दातृत्वशाली कार्याला अनेकांनी सलाम ठोकला आहे.