वाणिज्यमध्ये कमी खर्चात चांगल्या संधी- प्रा. सीए. पारख
नाशिकदि.३० (प्रतिनिधी): केटीएचएम महाविद्यालयात इयत्ता अकरावी वाणिज्य मध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थ्यांसाठी भव्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले गेले.रावसाहेब थोरात सभागृहामध्ये माजी विद्यार्थी संघातर्फे आयोजित या कार्यक्रमाला अकरावी वाणिज्य चे 900 विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी व्यासपीठावर नाशिकचे नाव जगात रोशन करणाऱ्या, आंतरराष्ट्रीय वक्ता, मिसेस इंटरनॅशनल लाईफ टाईम क्वीन डॉ नमिता कोहोक, वस्तू व सेवा कर सहायुक्त अनुश्री आराधी,वाणिज्य मार्गदर्शक व करिअर कौन्सिलर प्रा सीए लोकेश पारख, केटीएचएम चे प्राचार्य डॉ आर. डी. दरेकर, उपप्राचार्य व्ही.एस. सोनवणे व वाणिज्य विभाग प्रमुख एस. बी. पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी नुकताच अमेरिकेत ॲपीअरंस अवॉर्ड 2023 प्राप्त करून भारताचे नाव पुन्हा एकदा जागतिक स्तरावर रोशन करणाऱ्या डॉ. नमिता कोहोक यांनी त्यांचे सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास हे सुप्रसिद्ध मोटिवेशनल व्याख्यान देऊन उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांना जीवनाबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी कशा पद्धतीने कॅन्सर मधून बरे होऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार मिळवले याबद्दल आपला प्रवास दाखवला.
वस्तू व सेवा कर सहायुक्त अनुश्री आराधी यांनी यूपीएससी, एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी वाचन व आत्मविश्वास हे अतिशय महत्त्वाचे आहे असे सांगून त्यांनी त्यांच्या यूपीएससी मधील अंतिम मुलाखतीचे उदाहरण दिले केवळ आत्मविश्वासाच्या बळावर व लहानपणापासून केलेल्या वाचनामुळे त्यांनी अवघड अशी मुलाखत यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सांगितले.
प्रा सीए लोकेश पारख यांनी वाणिज्य क्षेत्रामध्ये होणाऱ्या नवीन बदलांची माहिती दिली. सीए चा नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून त्यांनी इयत्ता अकरावीपासूनच सुरुवात केल्यास यश मिळण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सांगितले. करिअरसाठी योग्य मार्गदर्शन सर्वात महत्त्वाचे असते याबद्दल उदाहरण देताना पारख यांनी फक्त योग्य मार्गदर्शनामुळे ते स्वतः अकरावीपासून सीए पर्यंत कसे प्रथम आले याबद्दल सांगितले.प्राचार्य डॉ दरेकर यांनी वाणिज्य विद्यार्थ्यांसाठी केटीएचएम महाविद्यालयात उपलब्ध असणाऱ्या विविध कोर्सेस व योजना याबद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सीए. लोकेश पारख यांनी केले.