करवंद नाका परिसरातील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करावी ..सेवा फर्स्ट ची मागणी
शिरपूर दि.१६(प्रतिनिधी)शहरातील करवंद नाका परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली आहे.यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छतेचे वातावरण पसरले आहे. याचा नागरिक,दुकानदार तसेच येथून येजा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. याची लवकरात लवकर दखल घेऊन नगरपालिकेने सदर शौचालयाची दुरुस्ती करावी. या मागणीचे निवेदन सेवा फर्स्ट च्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना देण्यात आले आहे.
शिरपूर शहरातील करवंद नाका परिसर या परिसरात विद्यार्थ्यांची नागरिकांची दुकानदारांची व्यवसायिकांची येजा होत असते. करवंद नाका मुख्य परिसरात एकच सार्वजनिक शौचालय आहे. आणि सध्या त्या शौचालयाची अवस्था खूप बिकट झालेली आहे. परिसरातील नागरिक, दुकानदार व विद्यार्थी अनेकांना या शौचालयामुळे त्रास होत आहे.
या शौचालयाच्या अवस्थेमुळे शौचालयाचे आजूबाजूला अस्वच्छता पसरत आहे. सकाळी व सायंकाळी महाविद्यालयाच्या वेळी विद्यार्थ्यांची या ठिकाणी वर्दळ असते.पण शौचालयाला कुठल्याही प्रकारचे संरक्षण नसल्यामुळे ये जा करत असलेल्या विद्यार्थिनींना त्रास होत आहे.
शिरपूर वरवाडे नगर परिषद प्रशासनाने या संपूर्ण प्रकाराची पाहणी करावी. व या शौचालयाचे नूतनीकरण करावे. जेणेकरून परिसरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना, दुकानदारांना या शौचालयामुळे त्रास होणार नाही.आणि परिसरात अस्वच्छता पसरणार नाही.
ग्रामीण भागातून महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी या ठिकाणी असते. याकडेही नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही व वाहतूक कोंडी होणार नाही. अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी 'सेवा फर्स्ट' चे हंसराज चौधरी, पुष्पक जैन , राहुल चौधरी , सुयश चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते.