चोपड्यात तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला..२ संशयित ताब्यात..शहरभर शुकशुकाट.. अफवांवर विश्वास ठेऊ नका पोलीस अधिकाऱ्याचे आवाहन
चोपडा दि.२०(प्रतिनिधी)शहरातील साने गुरुजी वसाहतमधील रहिवासी असलेल्या आकाश संतोष भोई या तरुणावर काही घटनेला कारणीभूत असल्याचे संशयावरून काही तरुणांनी तीक्ष्ण हत्याराने प्राण घातक हल्ला करून डोक्यावर ३ व डाव्या बटूकवर(ढूंगण) २ वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.त्यास पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.२संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान घटनेची वेग वेगळ्या अफवा शहरभर पसरल्याने दोन गटांमध्ये गर्दी जमा होऊ लागल्याने पोलिसांनी तात्काळ पोलिसांची कुमक मागवून परिस्थिती आटोक्यात आणली असून अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी कृषीकेश रावले व पोनि के.के.पाटील यांनी केले आहे.
घटनास्थळी जमलेल्या जमावाकडून प्राप्त माहितीनुसार
गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी शहरातील साने गुरुजी वसाहत मधील एका तरुणाने पळून तरुणीशी विवाह केल्याने ते दोघेही शहराबाहेर आहेत. परंतु त्या दोघांच्या विवाहसाठी आकाश संतोष भोई यांने मदत केल्याच्या कारणावरून दि. 20 रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास काही तरुणांनी आकाश भोई याच्यावर शस्त्राने हल्ला चढवला. चाकूने डोक्यावर व डाव्या बटूकवर वार केले त्यात आकाश भोई हा जबर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ.पवन पाटील व डॉ.सपना पाटील यांनी प्राथमिक उपचार केले असून आकाश भोई यांच्या डोक्यावर ३ घाव मारले असून जवळपास आठ टाके पडले आहे तर डाव्या हातावर २ घाव लागले असून ७ ते८ टाके टाकण्यात आले आहेत. त्यास पुढील उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
दरम्यान जखमी आकाश भोई हा जळगाव जिल्ह्यातून हद्दपार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांपैकी ५ ते ६ जणांची ओळख पटवली असून २ जण ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोनि के.के.पाटील यांनी दिली आहे . जखमी युवकाचे स्टेटमेंट घेण्यासाठी पोलिस जळगाव रवाना झाले असून लवकरच गुन्हा नोंदविण्यात येणार असे पोलिस सुत्रांकडून कळविण्यात आले आहे
चोपडा शहरात संवेदनशील भागात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात शांतता असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांतर्फे पोनि के.के.पाटील यांनी केले आहे.
सदर घटनेचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरल्याने सर्व सामन्यांमध्ये घबराट पसरली. शहरातील सर्व लहान मोठे व्यवसायिकांनी दुकानांचे शटर बंद केली. तसेच शहरातील शाळांमधील मुलांना पालकांनी घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी केली. परंतु पोलिसांना घटना माहिती झाल्याबरोबर घटनास्थळी डीवायएसपी कृषीकेश रावले, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहा. पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, अजित साबळे, घनश्याम तांबे यांनी घटनास्थळी पोलीस कुमक घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दंगल सदृश परिस्थिती नसताना मात्र दंगल झाली अशी अफवा वाऱ्यासारखी पसरल्याने क्षणार्धात चोपडा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर मुख्य बाजारपेठ रस्त्यावरील सर्वच दुकानांची शटर बंद झाल्याने शुकशकाट दिसून आला.
डी वाय एस पी कृषीकेश रावले यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. वातावरण चिघळू शकते असे डीवायएसपी कृषीकेश रावले यांनी दुकान चालकांना सांगितल्याने चार वाजेनंतर पुन्हा छोटे-मोठे व्यवसायिकांनी दुकाने बंद केली. चोपडा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून वैयक्तिक कारणावरून झालेल्या वादामध्ये कोण कोण समाविष्ट आहे याबाबत पोलीस कसून चौकशी करीत आहेत. परिस्थिती जरी नियंत्रणात असली तरी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. मात्र सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.