चोपडा महाविद्यायातर्फे नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी अभियानाचे यशस्वी आयोजन

 चोपडा महाविद्यायातर्फे नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी अभियानाचे यशस्वी आयोजन

   


चोपडा,दि.३१(प्रतिनिधी) - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी अभियानाचे आयोजन मार्च महिन्यात करण्यात आलेले होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, श्री. एन. एस. कोल्हे हे उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून शिक्षणशास्त्र विद्यालयाचे प्रा. बी. एच. देवरे उपस्थित होते. 

अभियान कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेशकुमार वाघ केले. यावेळी प्रास्तविक करतांना ते म्हणाले की, भारतीय शिक्षण पद्धतीत व शैक्षणिक रचनेत नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० नुसार आमुलाग्र बदल होणार आहेत. त्याविषयी सर्व घटकांना म्हणजेच विद्यार्थी, पालक, संस्थाचालक, प्राचार्य, अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना नवीन शैक्षणिक धोरणाची ओळख होणे, हा या अभियानाच्या आयोजनामागील उद्देश आहे. तदनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष, मान्यवर मार्गदर्शक व अतिथिंचे स्वागत मानवस्त्र व पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. मार्गदर्शक प्रा. बी. एच. देवरे यांनी नवीन शैक्षणिक धोरण – २०२० मधील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण रचनेच्या बाबतीत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे वयानुरूप अभ्यास पातळी व अभ्यासक्रम यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी म्हणाले की, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक, प्राचार्य, अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती प्राप्त होवून त्याचे दूरगामी परिणाम राष्ट्र विकासावर कसे असतील याची माहिती दिली.  या उदघाटन सत्राचे सूत्रसंचलन मुकेश पाटील यांनी केले तर डी. डी. कर्दपवार यांनी आभार मानले. 

दिनांक १५ मार्च रोजी प्रा. एल. बी. पटले यांनी राष्ट्र विकासाला पोषक असणारे व विद्यार्थ्याला अधिकाधिक सक्षम करणारे  व आवडीनुसार विविध विषय खुले असणारे नवीन शैक्षणिक धोरण हे पोषक असून त्याची अंमलबाजवणी पुढील शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात होत असल्याचे प्रतिपादन केले. 

दिनांक २८ मार्च रोजी प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक-कर्मचारी यांना नवीन शैक्षणिक धोरण याविषयी विस्तृत स्वरूपाची माहिती दिली. नवीन शैक्षणिक धोरणातील उच्च शिक्षण या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. विविध विद्याशाखेच्या अभ्यासक्रमात प्रथम वर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम, द्वितीय वर्षांनंतर पदविका अभ्यासक्रम, तृतीय वर्षांनंतर पदवी व चतुर्थ वर्षांनंतर होनर्स पदवी  व पदव्युत्तर अभ्यासक्रम रचनेची माहिती दिली. विद्यार्थ्याच्या स्वेच्छेनुसार एंट्री व एक्झिट तत्वाचे पैलू देखील त्यांनी उलगडून दाखविले. तर द्वितीय सत्रात प्रा. दीनानाथ पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणि त्यामुळे उच्च शिक्षण प्रवाहात होणारे संभाव्य बदल याविषयी मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरण सर्व संबंधित घटकांनी समजून घेवून त्यानुसार उचित कार्यवाही अभ्यासक्रम राबवितांना करण्याचे त्यांनी प्रतिपादन केले. 

     दिनांक २९ मार्च रोजी प्रा. डॉ. आर. आर. पाटील यांनी सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांना नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी विषयी सर्व संलग्नीत घटकांची मनोभूमिका याविषयी मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरणातील प्राथमिक ते उच्च शिक्षण यामध्ये पुढील वर्षापासून होणार्याय बदलांना सामोरे जातांना विद्यार्थी, पालक, अध्यापक, कर्मचारी यांचा सकारात्मक दृष्टीकोण हा अतिशय महत्वाचा असून धोरणातील मार्गदर्शक तत्वांचा अंगीकार करून प्रभावीपणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असे त्यांनी नमूद केले.

    या अभियानाच्या समारोप सत्राचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य मा. श्री. एन. एस. कोल्हे उपस्थित होते. यावेळी समारोपीय मनोगत व्यक्त करताना प्रा. कोल्हे म्हणाले की, अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, कर्मचारी वृदांना नवीन शैक्षणिक धोरण याविषयी सूक्ष्म माहिती प्राप्त झाली असून सर्व घटक यासाठी व होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी तत्पर झाल्याचे सांगितले. तसेच अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.  

      अभियान निमित्ताने विविध सत्रांना महाविद्यालयातील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी,  अध्यापक व कर्मचारी वृंद  सहभागी झाले होते. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती सदस्य डॉ. ए. बी.सूर्यवंशी, डॉ. एम. एल. भुसारे, मुकेश. बी. पाटील,  मयूर पाटील, मोतिराम पावरा, एस. जी.पाटील यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने