बोदवड महाविद्यालयात डिजिटल इंडिया या विषयावर कार्यशाळा संपन्न

 बोदवड महाविद्यालयात डिजिटल इंडिया या विषयावर कार्यशाळा संपन्न


बोदवड दि.०५( प्रतिनिधी): कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव प्रायोजित आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास कक्ष, बोदवड आयोजित भारतीय अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने डिजिटल इंडियाचे फायदे या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 

कार्यशाळेची सुरुवात प्रमुख अतिथी डॉ.बी. एच. बऱ्हाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी,उपप्राचार्य डॉ. विनोद चौधरी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील, महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.रूपाली तायडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्रमुख वक्ते नाहाटा महाविद्यालय भुसावलचे उप प्राचार्य डॉ.बी.एच.बऱ्हाटे यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल इंडियाचे उद्दिष्टे आणि फायदे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले जीडीपी, इंटरनेट, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती व इतर व्यवसाय या विषयांवर प्रकाश टाकला.

दुसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते डॉ. पवित्रा पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ग्रामीण विकास कसा झाला, कसा होतोय हे विविध उदाहरण देऊन स्पष्ट केले. सोबतच या संदर्भातील आव्हाने काय आहेत ते देखील सांगितले.

कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात बी.पी. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज चाळीसगाव येथील  डॉ. राहुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल इंडिया या संकल्पनेने शैक्षणिक व औद्योगिक विकासात कशी भर पडली हे प्रत्यक्षात स्वतःची व समाजातील काही व्यक्तींचे उदाहरणे देऊन पटवून सांगितले. विद्यार्थी एका वेळेस दोन पदवी संपादन करू शकतात आणि स्वतःचा विकास साधत नोकरीच्या संधी वेगवेगळ्या विभागात उपलब्ध करून घेऊ शकतात हे देखील स्पष्ट केले. डिजिटल इंडियाने मोठ्या वेगाने औद्योगिक क्षेत्रात प्रगती केली आहे याचे देखील अनेक दाखले दिलेत.

बोदवड महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी कार्यशाळेच्या चौथ्या सत्रात डिजिटल इंडियामुळे सामाजिक विकास कसा झालेला आहे आणि कसा साध्य करता येईल हे विशद करत असताना सामाजिक नियम, संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान, सामाजिक तर्क-वितर्क आणि आकलन या सर्वांसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोबतच सामाजिक विकास साध्य करत डिजिटल इंडियाचे ध्येय, उद्दिष्टे व फायदे सोदाहरण स्पष्ट केले. उपरोक्त चारही सत्र संपल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी खुली चर्चा आयोजित करण्यात आली त्यात विद्यार्थ्यानी सहभाग घेतला . विद्यार्थ्यांच्या शंका, प्रश्न व समस्या जाणून घेतल्या व त्यांचे निरसन देखील करण्यात आले. कार्यशाळेच्या शेवटच्या समारोपाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी 

अध्यक्षस्थानी होते . वैभव भोम्बे, दिपाली तायडे, अभिजीत शिंदे आणि निकिता पालवे यांनी दिवसभर सुरू असलेल्या कार्यशाळा संदर्भात आपली मनोगते व्यक्त केलेत. मनोगतात अशा प्रकारच्या कार्यशाळा वारंवार व्हाव्यात व सर्व विद्यार्थ्यांसाठी त्या असाव्यात अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे सहभागाबद्दलचे प्रमाणपत्र  मा. प्राचार्यांच्या हस्ते देण्यात आले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. नरेंद्र जोशी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.अजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रूपाली तायडे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा.कमलाकर पाटील, प्रा. अनिल धनगर, प्रा. विशाल जोशी, प्रा. शरद पाटील, कार्यालय अधीक्षक बाबुराव हिवराळे, समीर पाटील, राजू मापारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने