दोंडाईचा दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन
दोंडाईचा ,दि. १५ (प्रतिनिधी) येथील स्वो.वि.संस्थेच्या दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ४३ वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाची पूर्व तयारी म्हणून शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेचे संचालक तथा सेक्रेटरी मा.भाऊसाहेब सी. एन. राजपूत, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव (सामान्य प्रशासन)मा. श्री. ललितसिंग गिरासे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी.जी. गिरासे उपमुख्याध्यापक श्री. ए. एन. पाटील, पर्यवेक्षक श्री. एस. एफ. ठाकरे, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री. आर. ए. चित्ते, श्री. व्ही. एन. निळे, श्री. युवराज मगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री. आर. ए. चित्ते अध्यक्ष शिंदखेडा तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांनी विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व विशद केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. श्री. भाऊसाहेब सी. एन. राजपूत म्हणाले की, विज्ञान खरे आपल्या भारतीय धार्मिक ग्रंथांमध्ये दडलेले आहे. त्याचा शोध जगातील अनेक संशोधक करीत आहेत. ज्या-ज्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागतो आहे. त्यांचे मूळ आपल्या भारतीय धार्मिक ग्रंथात सापडते. आजच्या युगात नवनवीन विज्ञान संशोधनाची गरज आहे, कारण देश *'मेक इन इंडिया'* या संकल्पनेने दृढ होत आहे. तंत्रज्ञान दिवसागणिक झपाट्याने विकसित होत आहे डिजिटल इंडिया हे त्याचेच द्योतक आहे. शिक्षित व्यक्तीचे आयुर्मान अशिक्षित व्यक्ती पेक्षा दहा वर्षांनी वाढते. याचा शोध अमेरिकेच्या दोन शास्त्रज्ञांनी तब्बल 25 वर्ष निरीक्षण करून लावला आहे. याचा सारांश विचारात घेता शिकलेल्या व्यक्तीला आपल्या जीवन प्रवासात आपल्यातील जे जे दुर्गुण आहेत. ते लांब ठेवून संयमाने परिस्थितीला सामोरे जाण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित केलेली असल्यामुळेच त्याचे आयुर्मान वाढलेले दिसते. तसा सारासार विचार अशिक्षित व्यक्ती करताना दिसत नाही. तो आपल्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करतो म्हणूनच की काय? त्याच्या आयुर्मान कमी होते.
दरम्यान अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी सकाळ व दुपार विभागातील विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या विज्ञानाच्या उपकरणाची सविस्तर माहिती दिली.
शालेय विज्ञान प्रदर्शनात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विज्ञानाचे प्रयोग सादर करावेत. यासाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री. अजित परमार, प्रयोगशाळा परिचर श्री. भाईदास पाटील, आंतरवासिता शिक्षिका कु. ज्योत्स्ना बोरसे, कु. रोशनी पाटील, कु. धनश्री पाटील यांनी परिश्रम घेतले.
सदर शालेय विज्ञान प्रदर्शनात सकाळ विभागातील ३५ व दुपार विभागातील ४८ म्हणजे ८३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्या विज्ञान साहित्याचे परिक्षण करण्यासाठी श्री. सागर राजपूत, श्री. डी. के. गिरासे, किरण रत्नपारखे, कु. करूणा चव्हाण यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
सदर विज्ञान प्रदर्शनाला संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सरकार साहेबजी रावल, मा.मंत्री आ.श्री. जयकुमारभाऊ रावल, यांनी सदर कार्यक्रमास शुभेच्छा दिल्यात. विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. आय. गिरासे यांनी तर, आभार श्री. जे. जी. गिरासे यांनी केले.