" माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता" : इंद्रजीत भालेराव यांची भावनिक साद..प्रताप विद्या मंदिराचा शतकोत्तर पाचवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
चोपडा,दि.१० (प्रतिनिधी) : येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराचा शतकोत्तर पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या कवितांमधून ग्रामीण भागातील संघर्षमय जीवनाचा प्रवास मांडत "काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता,माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता" या आपल्या लोकप्रिय कवितेतून शेतकरी बापाची व्यथा मांडली. याशिवाय "एकुलती एक लाडाची लेक" ही जिजामातांवर आधारित कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. आपल्या मनोगतातून त्यांनी चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या सचोटी, प्रामाणिकपणाबद्दल संस्थाचालकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकातून संस्थेच्या सचिव माधुरीताई मयूर यांनी शाळेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. सोबतच इंद्रजीत भालेराव यांचा परिचय करून देताना त्यांनी शिक्षकांना प्रेरणा घेण्यासाठी आवाहन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संस्थेवर प्रेम करत आर्थिक मदत करणाऱ्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.यात राजूभाऊ शर्मा,डी व्ही याज्ञिक,आर आर शिंदे, एस बी कुलकर्णी, शाकेराबी मासूम,डी बी पाटील, अरुण पाटील, अतुल ठाकरे ,विशाल लाड,ए के बोहरी,प्रा एल ए पाटील,सुगंधी बंधू, सागर भदाणे, महेश (भैयाभाऊ) पवार आदी देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. माजी मुख्याध्यापक डी व्ही याज्ञिक यांच्या देणगीतून संस्थेतील सर्वच विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून त्यांचे तोंड गोड करण्यात आले.
संस्थेच्या विविध ज्ञान शाखांमधील पीएचडी प्राप्त शिक्षक बंधू-भगिनींचाही सन्मान यावेळी करण्यात आला. यात डॉ एल बी पाटील,डॉ श्रीमती रजनी सोनवणे,डॉ श्रीमती सविता जाधव यांचा सन्मान करण्यात आला.
दहावीच्या शालांत परीक्षेत केवळ शाळेतून नाही तर तालुक्यातून सर्वप्रथम आलेली विद्यार्थिनी सायली नितीन महाजन हिचा यावेळी उमा सुवर्णपदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.प्रताप प्रज्ञाशोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी रूपक शाम महाजन, शिवराज अनिल पाटील,कृतिका सुनील बाविस्कर यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सोबतच रंगोत्सव स्पर्धेतील राष्ट्रीय स्तरावरील विजेती विद्यार्थिनी अविका गायकवाड हिचा तर वेटलिफ्टिंग स्पर्धेतील गणेश दीपक महाजन या विद्यार्थ्याचाही गुणगौरव करण्यात आला.
दुपार विभागातील शिक्षक व्ही ए गोसावी, टी ई लोहार,एम एफ माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ७५ विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर स्वस्ताक्षरात लिहिलेल्या लेखांचा संग्रह करून तयार केलेल्या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
संस्थेच्या माजी सचिव स्व संध्याताई मयूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा 'संध्याताई मयूर प्रज्ञावंत शिक्षक पुरस्कार' यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील हिरालाल पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गेल्या 2015 पासून आतापर्यंत हा पुरस्कार 8 शिक्षकांना मिळालेला आहे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून अरुणभाई गुजराथी यांनी विद्यार्थ्यांना स्वप्नांच्या पूर्तीसाठी अविरत मेहनत घेण्याचे आवाहन केले. थिंक बिग, ड्रीम बिग,ॲक्ट बिग हा मंत्र देत त्यांनी विद्यार्थ्यांना उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी चोपडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरीताई मयूर, कार्यकारणी सदस्य चंद्रहास गुजराथी, भूपेंद्र गुजराथी,रमेश जैन,सर्व देणगीदार, समन्वयक गोविंद गुजराथी ,उपमुख्याध्यापक एस जी डोंगरे, ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य जे एस शेलार,पर्यवेक्षिका माधुरी पाटील, पर्यवेक्षक एस एस पाटील, पी डी पाटील,विविध ज्ञान शाखांचे आजी-माजी पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए एन भट,व्ही ए गोसावी यांनी केले. ईशस्तवन पी बी कोळी,पंकज नागपुरे आणि त्यांच्या चमूने सादर केले.आभार प्रदर्शन मुख्याध्यापक पी एस गुजराथी यांनी केले.