चोपड्यात गोवर आजाराचा प्रादुर्भाव संक्रमित भागात कॅम्प लावण्याचे आदेश

 चोपड्यात गोवर आजाराचा प्रादुर्भाव संक्रमित भागात कॅम्प लावण्याचे आदेश



 *चोपडादि.२० ( प्रतिनिधी  ) -* राज्यात शहरी भागासह ग्रामीण वस्त्यांमधील ९ वर्षांखालील मुलांमध्ये गोवर या आजाराची लागण वाढती असून सदर बाब चिंताजनक आहे.चोपडा शहरात अचानक गोवर आजाराचे रुग्ण वाढू लागले असून वेळेत परिस्थिती हाताळता यावी यासाठी आज रोजी नगर परिषदेच्या सभागृहात तातडीची बैठक घेण्यात येऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी हेमंत निकम,नगर पालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत बारेला यांनी उपस्थित आशा वर्कर,परिचारिका यांना आवश्यक त्या सूचना दिल्यात.

 यावेळी डॉ.चंद्रकांत बारेला यांनी चोपडा शहर व शहरातील स्लम भागातील स्थिती मांडत के.जी.एन.कॉलनी,साने गुरुजी वसाहत भागात अनुक्रमे तीन व एक असे गोवर रुग्ण आढळले असून काही संशयित बालकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून लवकरच त्यांचा अहवाल येईल असे सांगितले,आशा वर्कर, परिचारिका यांच्याकडून जवळजवळ पूर्ण शहराचा सर्व्हे पूर्ण झाला आहे,९ वर्षाखालील बालके किती त्यांची विभागवार आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध असून,पालकांनी जागृत राहून मुलांना सर्दी,ताप,अंगावर चट्टे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधावा,बूस्टर डोस,गोवर लस लावून घ्यावी असे आवाहन केले.तसेच या कामी आवश्यकता भासल्यास अंगणवाडी सेविका,मदतनीस यांचीही मदत घेतली जाईल असे स्पष्ट केले.बाधित परिसरात उद्या पासूनच कॅम्प लावून लसीकरणाला प्रारंभ करा अशा सूचना दिल्या.

 याप्रसंगी बोलतांना मुख्याधिकारी हेमंत निकम म्हणाले की,सध्या सर्वच शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे, पण गोवर आजाराचा संसर्ग बघता सर्वच शाळांनी आपापले समारंभ पुढे ढकलावेत तसे पत्र प्रशासनाच्या वतीने लवकरच सर्व शाळांना दिले जाईल,प्रभागवार लोकप्रतिनिधी यांनी या विषयी जनजागृती करून लसीकरण करण्यात शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

 बैठकीला बालरोगतज्ज्ञ डॉ.आनंद पाटील,डॉ. नीता जैस्वाल,नगर परिषदेचे प्रशासकिय अधिकारी निलेश ठाकूर यांच्यासह पत्रकार बांधव हजर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने