सातव्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू.. घातपात असल्याचा कुटूंबियांचा आरोप
जळगाव दि.०४(प्रतिनिधी प्रवीण कोळी)* शहरातील दुध फेडरेशन जवळ असणार्या एका अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून पडून तरूणाचा मृत्यू झाला असून त्याचा घातपात करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त असे की, कृष्णा सुधीर अहिरे ( २० हरीविठ्ठल नगर) या तरूणाने दुध फेडरेशन परिसरातल्या राजमालती नगरात असणार्या अपार्टमेंटवरून सातव्या मजल्यावरून उडी घेतली. त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्थानकाचे एएसआय उल्हास चर्हाटे, प्रफुल धांडे, राजकुमार चव्हाण, जयश्री मराठे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कृष्णा अहिरे याचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात पाठवून या अपघाताचा पंचनामा केला.दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच कृष्णा अहिरेच्या कुटुंबियांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेऊन प्रचंड आक्रोश केला. कृष्णा याने आत्महत्या केली नसून त्याला कुणी तरी इमारतीवरून ढकलून दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज सकाळी त्याला चार-पाच तरूण घरी येऊन घेऊन गेले होते. त्यांनीच कृष्णाचा घातपात केल्याचा संशय देखील कृष्णा अहिरे यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी सखोल पोलीस चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
