*किल्ले चौगावच्या विकासासाठी कटिबद्ध:* उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे
चोपडा दि.03(प्रतिनिधी): सातपुड्याच्या कुशीत असलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले चौगावच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असे आश्वासन किल्ले चौगावच्या भेटी प्रसंगी अमळनेर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी दिले.ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीच्या निमंत्रणाला मान देत त्यांनी गडपर्यटन केले. आझादीका अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात आढावा घेत चोपडा तहसीलदार अनिल गावित यांच्या समवेत त्यांनी गडाचा इतिहास जाणून घेतला. ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांना किल्ले चौगाव च्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी सहाय्य करण्याचे निवेदन दिले. किल्ले चौगावचे ऐतिहासिक आणि पर्यावरणीय महत्त्व पाहता गडाच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून संवर्धन राबवण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या भेटी प्रसंगी चोपडा येथील तहसीलदार अनिल गावित यांनीही संवर्धनासाठी तत्पर असल्याचे सांगितले.
यावेळी प्रताप विद्या मंदिराचे उपशिक्षक तथा स्थानिक इतिहासाचे अभ्यासक पंकज शिंदे, चौगाव वन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्राम तेले, ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समिती व राजा शिवछत्रपती परिवाराचे सदस्य महेंद्र राजपूत, मनोहर पाटील, ग्रामसेवक सतीश कोळी, तलाठी भूषण पाटील, महसूल आणि वनविभागाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
