महिला मंडळ शाळेत महापुरुषांना अभिवादन
चोपडा दि.०१(प्रतिनिधी) - येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालय भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. तसेच याप्रसंगी शालेय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव येथील निवृत्त कलाशिक्षक व ख्यातनाम चित्रकार राजू बाविस्कर हे होते. तर मंचावर मुख्याध्यापक सुनील चौधरी, पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्येष्ठ शिक्षक भास्कर माळी, अनिल महाजन, मिशन बंगला वसतिगृह अधीक्षक निलेश सपकाळे हे उपस्थित होते.
प्रत्येकाच्या जीवनात वाचन अत्यंत महत्त्वाचे असून वाचनाने माणूस समृद्ध होतो. लोकमान्य टिळक तसेच अण्णाभाऊ साठे यांनी ग्रंथ वाचनासोबतच मनुष्य आणि समाजाच्या समस्या वाचण्याचा प्रयत्न केला. समाजाचे दुःख समजून घेतले. त्यांनी आपल्या लेखनातून आणि वाणीतून समाजाला दिशा दिली, असे प्रतिपादन राजू बाविस्कर यांनी याप्रसंगी केले.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी महापुरुषांबद्दल आपले विचार व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण चंद्रकांत चौधरी व संजय बारी यांनी केले तर सूत्रसंचालन संजय सोनवणे यांनी, परिचय अनिल महाजन यांनी व आभार प्रदर्शन सुनील पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनराज महाले, भावेश लोहार यांच्यासह बाळासाहेब भालेराव, संजय पाटील यांनी परिश्रम घेतले.