मू.जे.महाविद्यालयाच्या एन.मुक्ता. स्थानिक युनिटच्या वतीने गुरु वंदन सोहळा संपन्न

 मू.जे.महाविद्यालयाच्या एन.मुक्ता. स्थानिक युनिटच्या वतीने गुरु वंदन सोहळा संपन्न 



जळगाव,दि.२६ (प्रतिनिधी)    “भारतीय संत परंपरेत गुरु संकल्पना ही अत्यंत महत्वाची मानली गेली आहे. जो सुयोग्य वाट दाखवितो, परमेश्वराची ओळख करून देतो, आप-पर भावनेच्या पार घेवून जातो, त्या सत्पुरुषाला गुरु म्हटले गेले आहे. असा गुरु सत्प्रवृत्ती आणि सद्विचार आपल्या शिष्यांना देवून गुरु धन्य होत असतो. आधुनिक काळात अनेक संकल्पना बदलत आहेत. मानवी विचार आणि जीवन सुद्धा सतत बदलत आहे. अशात मनुष्याच्या मनुष्यत्वाच्या कक्षा अरुंद होत असतांना आणि सदसद् विवेकाच्या रेषा पुसट होत चालल्या असतांना त्याला योग्य मार्ग दाखविणाऱ्या गुरूची आवश्यकता भासत आहे. दिशाहीन आणि वाईट वृत्तीच्या आहारी गेलेल्या पिढीला चांगल्या वाटेवर आणणे आणि त्यांना मानवी वृत्तीच्या योग्य स्वरुपाची ओळख करून देण्याचे दायित्व आजच्या गुरूंवर आहे. आपण सर्व शिक्षक गुरूंनी आपल्या क्षमतांचा संपूर्ण उपयोग करून आपल्या विद्यार्थ्यांना घडवावे, यातच आपली खरी सार्थकता असेल.” असे प्रतिपादन अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाचे संरक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांनी एन.मुक्ता.मू.जे.महाविद्यालय युनिट च्या वतीने आयोजित गुरु वंदन कार्यक्रमात केले. 

     प्राध्यापकांना शिक्षण आणि ज्ञानदान प्रकियेत सर्वार्थाने आपले  योगदान देता यावे, तसेच त्यांच्यामध्ये कर्तव्य आणि दायित्वाच्या जाणीवेची ज्योत सतत तेवत राहावी म्हणून वर्षभरामध्ये कर्तव्य बोध दिवस आणि गुरु वंदन असे दोन कार्यक्रम एन.मुक्ता.च्या वतीने घेण्यात येत असतात. त्याचाच भाग म्हणून एन.मुक्ता.मू.जे. महाविद्यालय युनिटच्या वतीने आज गुरुवंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये प्रमुख वक्ते डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांनी मनुष्याच्या जीवनात गुरूंचे जे स्थान आहे याविषयी अनेक दाखले देवून गुरूंचे महत्व उपस्थि तांना पटवून दिले. त्यांनतर मू.जे.महाविद्यालयाचे डॉ.केतन नारखेडे यांनी उपस्थित सदस्यांना शिक्षण प्रकीयेचे विविध आयाम, आगामी प्राधिकरण निवडणूक आणि प्राध्यापकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थानिक युनिटचे अध्यक्ष डॉ.भूषण कविमंडन यांनी भूषवले. प्रास्ताविक आणि संचालन प्रा.विजय लोहार यांनी केले. या गुरुवंदन सोहळ्याला मोठ्या संख्येने एन.मुक्ता.सदस्य उपस्थित होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने