दगडी दरवाज्या समोरील उघड असलेली गटार तात्काळ दुरुस्त करा…. पंकज चौधरी यांची मागणी…
अमळनेर दि.१०(प्रतिनिधी दीपक प्रजापती): येथील राजे संभाजी चौक जवळ दगडी दरवाज्या समोरील शहराची मुख्य गटार दुरुस्ती तात्काळ करण्याची मागणी माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांनी केली आहे. ही मागणी त्यांनी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यात्रेत ये – जा करणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये व रथोत्सव सुरळीत पार व्हावा यासाठी केली आहे.
शहराला सुमारे 250 वर्षाची परंपरा असलेल्या संत सखाराम महाराज यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रथोत्सव , पालखीउत्सव पार पडणार आहे. या प्रसंगी मोठा जनसागर परिसरात (राजे संभाजी चौकात) गोळा होतो. मागील काळात मुख्य गटारीवर दुचाकी चालकांचा अपघात देखील झाला होता. तरी सदर गटार दुरुस्तीसाठी नगरपरिषदेने तात्काळ कारवाई करावी अन्यथा यात्रोत्सव दरम्यान अपघात होऊन गालबोट लागू शकतो. आणि जर नगरपरिषदेला शक्य नसेल तर आम्हाला कळवावे. किंवा आम्ही लोकसहभागातून हे काम करून घेऊ या बाबत देखील आम्हाला लवकरात लवकर खुलासा द्यावा असे पत्र आज दि 09 रोजी पंकज चौधरी यांनी नगर परिषदेस दिले आहे. नगरपरिषद या बाबत काय दखल घेते या कडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.