एक कोटी रुपयातुन होतोय न.प.रुग्णालयाचा कायापालट : डॉ.चंद्रकांत बारेला यांचे यश
चोपडादि.०९ ( प्रतिनिधी ) येथील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान ( एन.यु.एच.एम.)अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या नगर परिषद रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत बारेला यांनी सतत, प्रयत्न व पाठपुरावा करून डॉक्टर्स फॉर यु या सामाजिक संस्थेकडून (एन.जी.ओ.) त्यांच्या सी.एस.आर.फंडातून नगर परिषद रुग्णालयासाठी सुमारे एक कोटी रुपयांचे अनुदान मिळवले असून,त्यातून दवाखान्याचा कायापालट होण्याचे कार्य सुरू आहे.शहरी व ग्रामीण भागातील गरीब,गरजू लोकांसाठी हा दवाखाना भविष्यात वरदान ठरणार असून डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
याबाबत सविस्तर असे की, शहरी व ग्रामीण भागातील स्लम एरियातील गरजू रुग्णांसाठी न.प.रुग्णालय महत्वाचे साधन मानले जात असले तरी, दवाखान्यात असणारे जुने साहीत्य जुन्या उपचाराच्या पध्दती,सोयी, सुविधांचा असणारा अभाव,यामुळे पाहीजे तशी रुग्णसेवा देता येत नव्हती.येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रकांत बारेला हे अनेक दिवसांपासुन ही मरगळ कशी झटकली जाईल त्या मार्गाच्या शोधात होते.अनेक बँक,संस्था यांच्या ते संपर्कात होते.शेवटी यासाठी त्यांना शहरातील एच.डी. एफ.सी.बँकेचे अतुल गुजराथी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. डॉक्टर्स फॉर यु या संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर साकेत झा यांच्याशी बोलणे होऊन रुग्णालया बद्दल त्यांना माहीती डॉ.बारेला यांनी दिली व प्रत्यक्ष भेट देण्याची विनंती केली.साकेत झा यांनी भेट देऊन पाहणी केली. व आपल्या सी.एस.आर. फंडातून एक कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यात डॉ. बारेला यांनी कामात गुणवत्ता व पारदर्शकता असावी म्हणून सर्व कामे आपण आपल्याच एजन्सी मार्फत करावीत आम्ही त्यात कुठलाही हस्तक्षेप अथवा ढवळाढवळ करणार नाही अशी विनंती केली.त्यानुसार डॉक्टर्स फॉर यु या संस्थेचे साकेत झा यांनी त्यांच्या एजन्सी कडून कामाला प्रारंभ केला असून त्यात, मिनिटाला ५० लिटर ऑक्सिजन पुरवठा होईल असा महत्वाचा ऑक्सिजन प्लांट,२५ केव्ही सोलार पॅनल,२५ केव्हीचे जनरेटर,२५ लाखांचे साहीत्य
त्यात डिलीवरी रूम,ऑपरेशन रूम,बाह्यरुग्ण विभाग,पलंग, गाद्या,नवजात शिशूसाठी वार्मर इमारतीला रंगकाम,डागडुजी असे सर्वच काम पूर्णत्वास येत आहेत. रुग्णालयाला यानिमित्ताने
नवसंजीवनी मिळणार असून त्यातून रुग्णांना चांगल्या प्रतीची सुश्रुषा मिळणार आहे.याकामी नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, नगराध्यक्षा सौ मनिषाताई व जीवनभाऊ चौधरी यांचेही सहकार्य मिळाल्याचे डॉ.चंद्रकांत बारेला यांनी सांगीतले.सर्व कामे
पूर्णत्वास येऊन लवकरच त्याचे छोटेखानी समारंभाद्वारे लोकार्पण करण्यात येईल असेही डॉ. चंद्रकांत बारेला यांनी सांगीतले.