पत्रकारांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पत्रकार विकास महामंडळाची स्थापना करा..!अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी
♦️अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी
♦️ निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन
♦️1 मे 2022 रोजी प्रत्येक तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन
अलिबाग (जि. रायगड) /दि.29 :- पत्रकारांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पत्रकार विकास महामंडळाची स्थापना करावी, अशी मागणी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनने (एबीजेएफ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. पत्रकारांची आर्थिक स्थिती चांगली नसून त्यांना बँकांकडून कर्ज घेताना खूप अडचणींना सामोरे जावे लागते, त्यामुळे पत्रकारांचे जीवन सुधारण्यासाठी केंद्र सरकारने पत्रकार विकास महामंडळाची स्थापना करावी आणि त्या महामंडळामार्फत 'मुद्रा लोन' प्रमाणे या महामंडळाने पत्रकारांना व्यवसायासाठी ५० हजार ते १० लाखांचे कर्ज द्यावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यासोबतच पत्रकारांसाठी स्वतंत्र हेल्थ कार्ड, पत्रकारांसाठी टोलमाफी आणि डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी अॅक्रिडेशन कार्ड अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF) कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जारी करण्यात यावे. पत्रकारांच्या मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनच्या वतीने 1 मे 2022 रोजी देशातील प्रत्येक तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी सांगितले.
राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी पुढे म्हणाले की, अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश जी यांच्या नेतृत्वाखाली संघटना पत्रकारांच्या हितासाठी लढत आहे. त्यामुळे 1 मे 2022 रोजी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनच्या वतीने दिल्ली जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार होते, मात्र दिल्लीतील वाद आणि ईदमुळे 1 मेच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे आता प्रत्येक तहसील कार्यालयाबाहेर अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे पदाधिकारी आंदोलन करणार असल्याचे पिंजारी यांनी सांगितले.
न्यायव्यवस्था आणि पत्रकारांमुळेच आज लोकशाही जिवंत आहे. पत्रकार आपल्या लेखणीतून सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, पीडितांना न्याय मिळवून देणे, गरिबांसाठी आवाज उठवणे, भ्रष्ट अधिकारी आणि नेत्यांना चाप लावण्याचे काम करीत असतात. ते म्हणाले, पत्रकार कोणीही असो. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया असो, पण तो पत्रकार आहे. अशा समाजासाठी आणि लोकशाहीसाठी जगणाऱ्या पत्रकारांना (समाजयोद्धा) शासकीय योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी पत्रकार फिरोज पिंजारी यांनी केली आहे.
* पत्रकार विकास महामंडळाची स्थापना करा :- पत्रकाराची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत असून बँकही त्यांना कर्ज देत नाही. त्यामुळेच बातम्यांच्या माध्यमातून कुटुंब चालवणे अवघड असल्याने केंद्र सरकारने पत्रकारांसाठी पत्रकार विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी पत्रकार फिरोज पिंजारी यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, पत्रकार विकास महामंडळाची स्थापना करून ‘मुद्रा लोन’ तत्त्वावर त्या महामंडळामार्फत पत्रकारांना ५० हजार ते १० लाख रुपयांचे कर्ज देण्यात यावे. या कर्जामुळे पत्रकार लघुउद्योग करून स्वावलंबी होऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे, असेही पिंजारी म्हणाले.
* निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन :- अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस खलील सुर्वे, कोकण प्रदेश अध्यक्ष नरेश जाधव, कोकण प्रदेश सचिव सुधीर माने यांनी आज रायगडच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बेनाडे यांना पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
* 1 मे रोजी खालापूर तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन :- दिल्लीतील वाद आणि ईदमुळे 1 मे 2022 च्या आंदोलनाला दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे आता खालापूर तहसील कार्यालयाबाहेर अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस खलील सुर्वे, महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार पहिलवान हनुमंतराव ओव्हाळ, कोकण प्रदेशाध्यक्ष नरेश जाधव, कोकण प्रदेश सचिव सुधीर माने, कोकण प्रदेश सरचिटणीस डॉ. अरुण ठोंबरे, रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिपक पाटील, कर्जत तहसील अध्यक्ष प्रशांत खराडे, नेरळ शहर अध्यक्ष संदेश साळुंखे आदींसह एबीजेएफचे पदाधिकारी ठिय्या आंदोलन करणार आहेत. या संदर्भात आज रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक, खालापूर तहसीलदार, खालापूर पोलीस निरीक्षक यांना पत्र देण्यात आले.
खोपोली, खालापूर, कर्जत, रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण प्रदेशाध्यक्ष नरेश जाधव यांनी केले आहे.