*कोळी जमातीला बोगस आदिवासी म्हणाल तर याद राखा..* तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांचा सज्जड दम.
*चोपडा दि.०२(प्रतिनिधी)* महाराष्ट्र आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे नुकताच आदिवासी जमातींच्या न्याय व हक्कासाठी महामेळावा घेण्यात आला.मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे यांची उपस्थिती होती.मेळाव्याचे आयोजन माजी पोलिस अधिकारी भाऊराव बागूल (नंदुरबार), उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे (जळगाव) यांनी केलेले होते.हा मेळावा यशस्वीपणे संपन्न झाल्याने शहादा येथील फोटोग्राफर संदीप वळवी नामक व्यक्तीने व्हॉटसअपच्या माध्यमाद्वारे गालबोट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.आदिवासी कोळी समाजाची बदनामी करतांना त्याने आपल्या पोस्टमध्ये या मेळाव्याला "बोगस कोळींचा महामेळावा" असे म्हणतांना इतरही आक्षेपार्ह लिखाण केलेले आहे.याबाबत आदिवासी कोळी समाजामध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे.ह्या व्यक्तिवर आदिवासी कोळी जमातीची बदनामी केल्याबद्दल पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत असुन सर्वस्तरातुन त्याचा निषेध केला जात आहे.
विशेष म्हणजे आजपर्यंत आदिवासी कोळी समाजाने इतर आदिवासी जमातींबाबत कधीच आक्षेप घेतलेला नाही.किंवा कुणाच्या विरोधात खोट्या केसेस वगैरे दाखल केलेल्या नाहीत.शासन प्रशासनातर्फे कोळी जमातीला हेतुपुरस्सर वेठिस धरले जात असुन त्यासाठी कोळी समाजाचे नेते आपापल्या परीने समाजाच्या न्याय्य व हक्कासाठी सतत संघर्ष करीत आहेत.मग इतर आदिवासी जमातींनी कोळी समाजाला बोगस आदिवासी का म्हणावे ? जर यापुढे कुणी कोळी जमातीला बोगस आदिवासी म्हणत असेल तर याद राखा,अशा समाज विघातक प्रवृत्तींच्या विरोधात राज्यभर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील,असा सज्जड दम व कडक इशारा चोपडा म.वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये दिलेला आहे.