पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्यालय येथे आरोग्य तपासणी शिबीर आणि व्यसनमुक्ती जनजागृती
मुंबई दि.२२ ( शांताराम गुडेकर )खांदा कॉलनी, सेक्टर १०, प्लॉट नंबर २८, पनवेल येथील राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्यालय येथे आशा फाऊंडेशन, बिलिऑनर डायबेटिक क्लब, दृष्टी फाऊंडेशन व आरोग्यम मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण बॉडी चेकअप, नेत्रचिकित्सा, थायरॉईड, डायबेटिक तपासणी, व्यसनमुक्ती प्रबोधन आणि समुपदेशन असे आरोग्य शिबीर आयोजित केले होते.
सद्य स्थितीत कारोनामुळे दिवसेंदिवस नवनवीन समस्या उद्भवत आहेत. कोरोनाचा परिणाम कमी झालेला दिसत असला तरी या गेल्या दोन वर्षात लोकांचे वर्क फ्रॉम होम असल्याने कार्यस्थळी जाण्यास स्थलांतरण जास्त होत नाही, अती कामामुळे वेळी अवेळी उलट सुलट खाणे, अती ताण यातून डायबेटिस तसेच मोबाईल, लॅपटॉप, टिव्ही, यांचा अतिवापर होत आहे. ऑनलाईन शिक्षण यामुळे सतत मोबाईल, लॅपटॉप यांच्यासमोर बसून राहणे त्यातून लठ्ठपणा, नेत्र आजार, अतिताण वाढलेले रुग्ण दिसून आले आहेत. बरेच तरूणांना या लॉकडाऊन मुळे नोकऱ्या गमवाव्या लागल्या. बेरोजगारीमुळे चींतेतून तरुणवर्ग अती व्यसनांकडे वळू लागले आहेत तर त्यातून अनेक आजारांना आमंत्रण देत आहेत. अशा व्यक्तींशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करने आवश्यक आहे. याकाळातील उद्भवणाऱ्या ह्या समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी मोफत सामाजिक आरोग्यविषयक हे शिबीर घेण्यात आले. त्यात व्यसनमुक्तीचा संदेश देणार पोस्टर्स प्रदर्शन आणि प्रचार पत्रक वाटप केले. मुंबई संघटक यांनी उपस्थित नागरिकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला. येथील महिलांनी स्वतः चे यासंदर्भात प्रश्न मांडले आणि पुढील काळात या विषयावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहचवू असा निर्धार केला. तसेच मोफत ई- श्रमकार्ड नोंदणी व मतदार नोंदणी करण्यात आली.
त्याचबरोबर हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी दृष्टी फाऊंडेशनच्या नम्रता देवघेकर (सचिव), कार्यकारी सदस्य शिल्पा मोरे, श्वेता साळुंखे, वैधवी जाधव, वनिता गांगुर्डे, अंकिता कांबळे यांनी गीत सादरीकरण तसेच उपस्थित मान्यवरांचे आदरातिथ्य, येणाऱ्या नागरिकांची व्यवस्था, नाव नोंदणी कार्ये उत्साहाने पार पाडली. नुकतीच शिवजयंती झाल्याने प्रत्येकीने शिवाजी महाराज यांच्याबद्दल गोष्ट सांगून आपले मनोगत व्यक्त केले. "शिवाजी महाराजांची जयंती किंवा कोणत्याही महानव्यक्तींची जयंती ही उत्साहात साजरी करण्यासाठी रात्री २ वाजता मोठ मोठे बाईक किंवा गाड्यांचे हॉर्न वाजवून रॅली काढून उपयोग नाही त्यासाठी प्रत्येक घरात एक शिवाजी घडला पाहिजे हे तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक घरात जिजाऊ आणि शहाजी असतील" हि खरी मानवंदना ठरेल त्यांच्यासाठी असे वक्तव्य शिल्पा मोरे यांनी केले. शिवाजी महाराजांनी कोणतेही व्यसन केले नाही मग त्यांना मानणारे आजच्या काळातील मावळे हे व्यसन कसे काय करू शकतात. शत्रू पक्षाकडील स्त्रीला आई म्हणणाऱ्या या विरपुरूषाच्या विचारांना, बलिदानाला, मिळवून दिलेल्या स्वराज्याला खऱ्या अर्थाने तेव्हाच न्याय मिळेल जेव्हा त्यांची नीतिमूल्ये रोज आचरणात आणले जाईल.
यावेळी आरोग्यम मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल, बिलीऑनर डायबेटिक क्लब आणि आशा फाऊंडेशन, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई संघटक उपस्थित प्रियांका सवाखंडे, गणेश कदम, संतोष तांबे, विलास पांचाळ, अर्चना ताई, अण्णासाहेब आहेर, डॉ. एस. डी. कांबळे आदि मान्यवरांचे किशोर देवधेकर (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी), गणेश पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), शैलेंद्र हंकार (खारघर शहर अध्यक्ष), यशवंत लोखंडे (कामोठे शहर अध्यक्ष), विकी मोहोळ( प्रभाग १३ अध्यक्ष), अभिषेक चारी, अजय पाटील (जिल्हा सचिव) यांनी पुष्प गुच्छ देऊन आभार मानले. प्रियांका सवाखंडे आणि गणेश कदम यांनी महामानवांची विचार पुस्तिका देऊन व्यसनमुक्तीचा संदेश दिला. उपस्थित नागरिकांनी आजीवन व्यसनमुक्त राहण्याचा प्रयत्न करू आणि इतरांना व्यसनमुक्त होण्यास मदत करू असे आश्वासन दिले. परिसरातील सोसायटीमधील उपस्थितांचे आभार मानले.येथील जवळजवळ १५० रहिवासीनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. हा उपक्रम उत्स्फूर्तपणे पार पडला.