काल्पनिक चित्र
*लाचखोर गटशिक्षणाधिकाऱ्यासह शिक्षण तज्ज्ञास २ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले..लाच लूचपत प्रतिबंध विभागाच्या दणक्याने शिक्षण क्षेत्रातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ*
जळगाव दि.२३(प्रतिनिधी) : शाळेसाठी अनुदान मंजूर होण्यासाठी अनुकूल होण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच स्वीकारताना धरणगाव गटशिक्षण अधिकाऱ्यांसह समावेशीत शिक्षण तज्ज्ञास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने शिक्षण विभागाच्या लाचखोर
अधिकाऱ्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. गटशिक्षणाधिकारी अशोक दामु बि-हाडे (57, रा.राधाकृष्ण नगर, पिंपळे रोड, अमळनेर) व समावेशीत शिक्षण तज्ज्ञ तुळशिराम भगवान सैंदाणे ( 34, रा. बोरोले नगर, पंडीत कॉलनी, चोपडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
कार्यालयातच स्वीकारली लाच धरणगाव तालुक्यातील पाळखी खुर्द गावातील 45 वर्षीय तक्रारदाराची पाळखी खुर्द शाळा पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. ही शाळा 2016 पासून आजपावेतो ते स्वयं अर्थ सहाय्यता या तत्वावर चालवित आहेत. शासनाच्या राईट टू एज्युकेशन योजनेप्रमाणे 25 टक्के विद्यार्थी शाळेत भरावयाचे असतात. त्यासाठी शासन प्रत्येक विद्यार्थामागे आठ हजार रुपये वार्षिक अनुदान मंजूर करते. या शाळेतील 2020-21 या शैक्षणिक वर्षात आरटीई या योजनेंतर्गत शाळेत 17 विद्यार्थ्यांनी प्रवेश केला आहे. आठ हजार रुपयांप्रमाणे 17 विद्यार्थ्यांचे एक लाख 36 हजार रुपये प्रतिपूर्ती अनुदानाची रक्कम झालेली असून सदर अनुदान मंजूर होण्यासाठीचा अनुकूल अहवाल तयार करून जिल्हा परीषदेला देण्यासाठी आरोपी अशोक बिहाडे यांनी 30 डिसेंबर 2021 रोजी लाच मागितली होती व सोमवार, 24 जानेवारी रोजी सायंकाळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात संशयीत आरोपी समावेशीत शिक्षण तज्ज्ञ तुळशिराम सैंदाणे यांनी ती बिऱ्हाडे यांच्या सांगण्यानुसार स्वीकारल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी हा सापळा एसीबीचे नाशिक पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, वाचक पोलिस उपअधीक्षक सतीश डी. भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.