*विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालणारे निर्णय तत्काळ रद्द करावा अभाविप नाशिकची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
चांदवड दि.१८(प्रतिनिधी उदय वायकोळे)दिनांक १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. यामध्ये विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालत स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय हे प्रस्तावित असून येत्या अधिवेशनात ह्या निर्णयाचे रूपांतर कायद्यात करण्याचा मानस राज्य शासनाचा आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांचे कुलपती असणारे मा.राज्यपाल हे देखील कुलगुरूंची थेट नियुक्ती करू शकणार नाही. यापुढे कुलगुरू निवड राज्यशासनाने सुचवलेल्या दोन नावांमधूनच मा.राज्यपालांना करावी लागेल. राज्य शासन पूर्णपणे कुलपती अधिकारात हस्तक्षेप करीत आहे. विद्यापीठामध्ये कुलपती पदावर प्र.कुलपती म्हणून एक नवीन पद निर्माण करण्यात येणार असून त्या पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
या निर्णयाच्या विरोधात अभाविप नाशिकतर्फे मा.मुख्यमंत्र्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू महोदय प्रा.ई. वायुनंदन यांच्यामार्फत निवेदन देऊन सदर निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. *यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री विराज भामरे म्हणाले की “विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत आहे. यावरून स्पष्टपणे राजकीय पक्ष, नेते यांचा अवाजवी हस्तक्षेप विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेत वाढेल. सन्मा.कुलपती ( राज्यपाल ) हे सर्व विद्यापीठांचे प्रमुख आहेत, त्यांच्या अधिकारांवर हे सर्वार्थाने आक्रमण आहे.” “या निर्णयाने सर्व गुणवत्ताधारक प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यावर विपरीत परिणाम राजकीय दबावाने होऊ शकतो. प्रत्येक निर्णयासाठी विद्यार्थ्यांना राज्य शासनावर अवलंबून राहावे लागेल. विद्यापीठांची गुणवत्ता पूर्णपणे ढासळण्याची शक्यता या निर्णयाने निर्माण होत आहे. विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे राजकीयकरण या निर्णयामुळे होईल” असे देखील मत विराज भामरे यांनी व्यक्त केले.*
*शासनाच्या या कुटील निर्णयाला विरोध करत अभाविप नाशिक कॉलेज रोड गंगापूर रोड नगर सहमंत्री पूजा ताजनपुरे म्हणाल्यात की “महाराष्ट्र सरकार विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर गदा आणण्याचे काम करीत आहे. राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे व महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये शिक्षणाचे राजकीयकरण करण्याचा निंदनीय प्रकार बंद करावा.”* यावेळी संस्कार सोनवणे, साहिल गोमसाळे, देवेश चिंचाळकर, आदेश लांडगे, गौरव सोनी, शिवानी नाईक उपस्थित होते.सदर प्रसिद्धी पत्रक अभाविप कॉलेज रोड व गंगापूर रोड नगर कार्यालय मंत्री गौरव सोनी नाशिक येथून प्रसिद्धीस दिले आहे.