*आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी यश संपादित करावे - ॲड. संदीप पाटील*
चोपडा दि.२२ (प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र तसेच कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'करिअर कट्टा' ची सुरुवात करण्यात आली. करियर कट्टा माहिती फलकाचे अनावरण या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य श्री. एन. एस.कोल्हे, उपप्राचार्य श्री. बी. एस. हळपे, पर्यवेक्षक श्री. एस. पी. पाटील, श्री. एम. जी. पाटील व सौ. एम. टी. शिंदे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना 'करिअर कट्टा' चे समन्वयक श्री. वाय. एन. पाटील यांनी शासनाच्या उपक्रमांची इत्यंभूत माहिती तसेच या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया समजावून सांगितली.
यावेळी कविता बोरसे हिने या उपक्रमात सहभागी झाल्याने करिअर साठी झालेले फायदे याविषयी आपले अनुभव कथन केले तर ज्ञानेश्वर जोशी या विद्यार्थ्याने सायबर सिक्युरिटी व मोबी-अँप याविषयी आपले अनुभव कथन केले. यावेळी या उपक्रमात यशस्वी सहभाग नोंदवून उत्तम कामगिरी केल्याबद्दल कु. कल्याणी अविनाश पाटील या विद्यार्थिनीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी करियर कट्टा हा निश्चित रोजगार आणि व्यवसायासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे. या कट्टया अंतर्गत आय.ए.एस. अधिकारी, उद्योजक आपल्या भेटीला असे उपक्रम राबविण्यात येऊन त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्याना दिशादर्शक ठरणार आहे. प्रशासकीय अधिका-यांचे अनुभव हा विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारा असून या करियर कट्ट्याचा जास्तीत जास्त फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील यांनी महाविद्यालयात विद्यार्थी हिताच्या दृष्टीने राबविण्यात आलेल्या 'करियर कट्टा' या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून त्यांचा ज्ञान वाढीसाठी उपयोग करावा. विद्यार्थ्यांना आजच्या काळात यशस्वी होण्यासाठी अभ्यास व जिद्द या गोष्टींची आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रंथालय, आधुनिक ज्ञानप्राप्तीची साधने यांचा वापर योग्यरीत्या करून ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. एस.पाटील यांनी केले तर आभार डॉ. आर. आर. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करिअर कट्टा समन्वयक श्री.ए. एच. साळुंखे, डॉ. शैलेश वाघ, डॉ. ए. बी. सूर्यवंशी, डॉ. एम. एल. भुसारे, श्री. एम. बी. पाटील, श्री. व्ही. बी. पाटील यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.