*केळी पीक विमाधारक मंजूर रक्कम वाढवून देण्याचे सुधारीत आदेश द्यावेत* *खासदार उन्मेशदादा पाटील यांची राज्यकृषी आयुक्तांकडे मागणी..सन २०२०-२१ अंतर्गत केळी पिकांची नुकसान भरपाई ३६००० रुपये प्रति हेक्टरी द्यावी आयुक्तांकडे साकडे
जळगाव दि.३(प्रतिनिधी) - पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (हवामानावर आधारीत)सन २०२०-२१ अंतर्गत केळी पिकांची नुकसान भरपाई फक्त १३५०० रुपये देण्यात आली असून उत्पादन खर्च पाहता ही रक्कम तुटपुंजी आहे. त्यामुळे शासनाने पात्र विमाधारक यांना तातडीने हेक्टरी ३६००० रुपये द्यावेत अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज कृषी आयुक्त यांचेकडे केली आहे.
०५ जून २०२० पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२०-२१ अंतर्गत जळगाव तालुक्यातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांचे बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. यांच्या माध्यमातून क्लेम सेटल करून विमा रक्कम निश्चित झाली आहे.
परंतु वरील संदर्भीय शासन निर्णयानुसार व शेतकऱ्यांच्या प्राप्त होत असलेल्या सूचनेनुसार माझ्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील भोकर महसूल मंडळातील पात्र 3091 शेतकऱ्यांना रक्कम रु.6,27,64,660/- मंजूर झाले आहे.
या बाबत मा. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांच्या कार्यालयातून घेतलेल्या जळगाव जिल्ह्याच्या माहे - मार्च, एप्रिल व मे 2021 या महिन्यातील तापमान (महावेध) च्या नोंदी नुसार व जळगाव तालुक्यात मंजूर झालेली विमा रक्कमीची महिती घेतली असता मला खालील प्रमाणे त्रुटी लक्षात आलेल्या आहेत. यात प्रामुख्याने बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. यांनी जळगाव तालुक्यातील भोकर मंडळाचे केळी विमा संरक्षित रकमेचे क्लेम रू.13,500/- प्रति हेक्टर या प्रमाणात निश्चित केली आहे.मा. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांच्याकडून प्राप्त तापमानाच्या (महावेध) च्या अहवाल नुसार जळगाव तालुक्यातील भोकर महसूल मंडळाचे तापमान माहे 26/03/2021ते 31/03/2021 या कालावधीत सलग 6 दिवस 42°C पेक्षा जास्त असल्याचे कळते. वरील संदर्भ शासन निर्णयानुसार या कालावधीतील नुकसान भरपाईची रक्कम रु.9000/- प्रति हेक्टर याप्रमाणे असणे आवश्यक आहे.
तसेच 25/04/2021 ते 02/05/2021 या कालावधीत 8 दिवस व 04/05/2021 ते 12/05/2021 या कालावधीत 9 दिवस तापमान 45°C पेक्षा जास्त असल्याचे कळते. या कालावधीतील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे रक्कम रु.13500/- (माहे एप्रिल 2021) करिता व रक्कम रू.13500/- (माहे मे 2021) मंजुर होणे क्रमप्राप्त असल्याचे मला वाटते. वरील माहितीची पडताळणी केली असता एकट्या जळगाव तालुक्यातील भोकर महसूल मंडळास रक्कम रू.13500/- प्रति हक्टर या प्रमाणे रक्कम निश्चित केली असल्याचे कळते परंतु वरील नमूद केलेल्या शासन निर्णय व तापमानाच्या नोंदीनुसार दरील पात्र शेतकर्यांना रक्कम रू. 36000/- मंजूर करुन मिळावी.
माहे : एप्रिल व मे 2021 या कालावधीतील तापमानाचे सुधारित रक्कम मंजूर केल्यास पात्र 3091 शेतकऱ्यांना अंदाजित रक्कम रु.6.75 कोटी मंजूर व्हावी.
तसेच वरील संदर्भात नमूद शासन निर्णयानुसार कमाल नुकसान भरपाईची रक्कम रु. 45000/- असावी असे नमूद असून सदरील महसूल मंडळातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना रक्कम रु.36000/- एवढी नुकसानभरपाई मंजुर व्हावी. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली आहे.
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या पत्राची तात्काळ दखल घेऊन संबंधित विमा कंपनीस सुधारित क्लेम सेटल करून रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत आदेशित कराव्यात अशी मागणी कृषी आयुक्तांकडे केली आहे. आपल्या पत्राच्या प्रति मा.संचालक (फलोत्पादन) कृषि आयुक्तालय, पुणे , मा. मुख्य सांख्यिक, कृषि आयुक्तालय, पुणे,मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांचेकडे पाठविलेल्या पत्रात केली आहे.