तुळशीविवाहाचे...संस्कारमूल्य(आजची खास माहिती)
तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणा आहे. ती अशी, की जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योध्दा राक्षस होऊन गेला. त्याने आपल्या पराक्रमाने देवांना जिंकून वैभव प्राप्त केले आणि आपल्या भाईबंद दैत्यांस सुखी केले. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. तिच्या पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनात अजिंक्य ठरला होता. त्याने इंद्रपुरीवर चाल करून इंद्राची खोड मोडण्यासाठी कडेकोट तयारी चालवली होती. पुढे, देव व दैत्य यांच्यांत युध्द होऊन अनेक देवांस गतायू व्हावे लागले. तेव्हा विष्णूने जालंधरास युद्धात हरवण्यासाठी कपटकारस्थान रचले. त्याने जालंधराची पत्नी वृंदा हिच्या जाज्वल्य पातिव्रत्यामुळेच जालंधरास सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे जाणून, ते नष्ट करण्यासाठी युक्ती योजली.
विष्णूने दोन वानरांकडून जालंधर हा रणभूमीवर मारला गेला आहे अशी बतावणी करून, आपले शीर व धड तंतोतंत जालंधराप्रमाणे बनवून ते दोन अवयव वृंदेपुढे टाकले. तेव्हा वृंदा शोक करू लागली. इतक्यात, एका कपटी साधूने संजीवनी मंत्राने कपटवेषधारी जालंधरास म्हणजेच विष्णूस जिवंत केले! वृंदेने आपला पती जिवंत झालेला पाहून आनंदातिशयाने त्याला मिठी मारली. अशा प्रकारे, विष्णूने वृंदेसमवेत राहून तिचे पातिव्रत्य भंग केले. अज्ञानात का होईना पण वृंदेच्या पातिव्रत्यभंगामुळे जालंधर बलहीन होऊन लढाईत मारला गेला. काही काळानंतर, वृंदेस खरा प्रकार कळताच तिने क्रोधित होऊन विष्णूस शाप दिला, की त्याला पत्नीचा वियोग घडून दोन मर्कटांचे सहाय्य घेण्याची पाळी त्याच्यावर येईल. त्याप्रमाणे पुढे रामावतारी तसे घडले !
त्यानंतर लगेच वृंदेने अविकाष्ठ भक्षण केले. विष्णूलाही आपण कपटाने एका महासाध्वीचा नाहक नाश केला हे पाहून वाईट वाटले; इतकेच नव्हे तर तो वृंदेच्या रक्षेजवळ वेड्यासारखा बसून राहिला. विष्णूचे वेड घालवण्यासाठी पार्वतीने तेथे, वृंदेच्या रक्षेवर तुळस, आवळा व मालती यांचे बी पेरले. त्यातून तेथे तीन झाडे उत्पन्न झाली. त्यांतील तुळस ही आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे वाटून विष्णूस ती प्रिय झाली. श्रीविष्णूस तुळस अतिप्रिय म्हणून तिला हरिप्रिया म्हणतात. पुढे वृंदा हिनेही द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुध्द द्वादशीच्या दिवशी वरले. अशा प्रकारे, हिंदू लोक रुक्मिणी-कृष्ण विवाह तुळशी विवाहविधीच्या रूपाने त्या दिवशी दरसाल साजरा करतात. तुळशीचे लग्न हा पूजोत्सव आहे. त्यात तुळस ही वधू, बाळकृष्ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो. सोहळ्यासाठी तुळशी वृंदावन सारवून, सुशोभित केले जाते. तुळशीभोवती रांगोळी काढली जाते. वृंदावनात ऊस पुरून आवळे व चिंचा टाकतात. तुळशीच्या चारी बाजूंनी ऊसाचा मंडप उभारला जातो. मग विष्णुस्वरूप श्रीबाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली जाते. बाळकृष्णाला आवाहन करून त्यास स्नान, अभिषेक, नवीन वस्त्र, नवीन साज, तसेच नैवेद्य अर्पण करून त्याची आळवणी करतात. त्यानंतर तुळशीमातेचीही षोडशोपचारांनी पूजा करून, तिला सौभाग्यलेणे, नवीन साज, नवीन वस्त्र देऊन सालंकृत सजवतात. तुळस आणि श्रीकृष्ण विवाहासमयी चौरंगाच्या एका बाजूस श्रीकृष्ण तर दुस-या बाजूस तुळशीचे रोप ठेवून दोघांमध्येे अंतरपाट धरला जातो. मग सर्वांना अक्षता वाटल्या जातात. त्यानंतर मंगलाष्टके म्हटली जातात आणि गोरज मुहूर्तावर (सायंकाळी) श्रीकृष्ण-तुळशीचा विवाह सोहळा पार पडतो. प्रहर रात्रीच्या आत पूजा आटोपल्यावर वृंदावनाभोवती ऊस रचून केलेल्या मांडवाभोवती आरती, दीपाराधना उरकण्यात येते. त्यावेळी तुळशीच्या मुळात चिंचा व आवळे ठेवतात. जमलेल्या लोकांस लाह्या, कुरमुरे, ऊसाच्या गंडे-या देण्यात येतात.
हा विवाह केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असे सांगितले जाते. ते व्रत तुलसीवनात करणे हे विशेष पुण्यप्रद मानले आहे. या व्रताने सौभाग्य, संतती, संपत्ती, विद्या इत्यादी गोष्टींची प्राप्ती होते. तसेच रोगनिवारणही होते, अशी समजूत आहे. तुळशी विवाहाच्या व्रतासंबंधात दंतकथाही ऐकवली जाते.
तुलसीविवाहाचे अनेक काल सांगितले आहेत. परंतु बहुधा तो कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात. काही ठिकाणी तुळशीचे कन्यादान केल्यावर यथाविधी विवाहहोम करण्याचाही प्रघात आहे. पूर्वी कार्तिक शुद्ध द्वादशीस तुलसीविवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील, त्या सर्वांची समाप्ती करून व चातुर्मास्यात जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वत: सेवन करण्याची पद्धत होती.
श्रीविष्णू आषाढ शुद्ध एकादशीला शयन करतो व कार्तिक शुद्ध एकादशीला जागा होतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात, त्याला प्रबोधोत्सव असे नाव आहे. हा प्रबोधोत्सव आणि तुलसीविवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.
तुळशीच्या लग्नानंतर हिंदू लोकांच्या विवाहासंबंधी कार्यास सुरूवात होते. 'या सुमारास वधुपिते घराबाहेर पडतात व मुलीचे लग्न जुळवण्यासाठी चपला झिजवू लागतात’ असे पूर्वी म्हणत.
हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते, तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मातील धारणेमध्ये तुळशीला महत्त्व आहे.
"तुळसीचे पान. एक त्रैलोक्य समान |
उठोनिया प्रातःकाळी, वंदी तुळसी माऊली |
नाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचे
न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळसीसी
योगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाही"
अशा शब्दांत संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे. तुळशीमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो. दारात वा घरात तुळशीचे झाड असल्यास घरात पिसवा, हिवतापाचे जंतू शिरकाव करत नाहीत. तुळस प्रदूषणनाशक आहे. ताप, सर्दी, खोकला दूर करणे, हवा शुद्ध करणे हे तिचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत.
हिंदूंच्या अंत:करणात तुळशीसंबंधात पूज्यभाव आहेच; पण इतर धर्मीयदेखील तुळशीबद्दल आदर दाखवतात. इंग्रजी शब्दकोशात तुळशीला ‘पवित्र झाड’ असे म्हटले आहे. ग्रीक भाषेतील बेंझिलिकॉन हा तुळशीसंबंधीचा शब्द राजयोग या अर्थाचा आहे. तुळशीला फ्रेंच व जर्मन भाषांतही ग्रीक शब्दांप्रमाणे बहुमानाचे अर्थ लाभलेले आहेत. इटाली व ग्रीस देशांत प्राचीन काळी तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे असे मानत असत.
तुलसीविवाहाचं संस्कारमूल्य.....!!
कार्तिकी एकादशीपासून ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत सर्वत्र तुळशी विवाह सोहळा साजरा केला जातो. तुळस ही औषधी, नित्योपयोगी आहेच, शिवाय ती सालंकृत आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. अंगणातली तुळस ही यजमानाचं पाल्य आहे. तिला वंशवृद्धीक्षम होताच निसर्गरूपी देवाला अर्पण करणं म्हणजेच ‘तुलसीविवाह’. ‘तुलसीविवाहा’निमित्तानं तो साजरा करण्यामागचं हे शास्त्र..
दिवाळीची आठवण उजळणारा आकाशकंदील, डोळे मिचकवणारी तोरणं आणि तेजस्वी पण स्थिर नजरेच्या पणत्यांची आरास. विविध रंगानी रंगवलेला, रांगोळ्यांनी सजवलेला लग्नमंडप. केळवणापासून ते हळदीपर्यंतचे सर्व संस्कार सकाळापासूनच सुरू आहेत. हिरव्या शालूत वांगी रंगाची, रसरशीत, डेरेदार, सर्वागानं फुललेली पण अदबशीर शालीन-कुलीन वधू तुलसी. तेल हळदीनं उजळलेली कांती, सुस्रत आणि सालंकृत अशी ही यजमानांनी वाढवलेली ‘तुलसीदेवी नवरी’.
अशा अदबशीर वधूसोबत भडक रंगासह अपु-या व कातरलेल्या हिरव्या पानातून डोकावून वधुपेक्षा भाव खाणारा झेंडुसखा. मालती तर वधुमालेत सजून पाठराखीण म्हणून जाणार आहे. उंचउंच वाढलेला पण गोड स्वभावाचा, पात्याच्या टोकांना उसनी फुलं टोचून लग्नमंडपात मिरवणारा ऊस. मंगलकार्यात पुरोहिताएवढीच आवश्यक असणारी आंब्याची डहाळी. निमंत्रण आहे, आता माणसात राहून सुधारली तरी तुळशी सखी आम्हाला विसरली नाही, त्यामुळे जायलाच हवं म्हणून आलेले आवळा आणि चिंच, असे जुने वन्य मित्र-मैत्रिणी. असं हे व-हाड जमलंय.
शरदातली थंडी सूर्य मावळतीकडे कलताच अंगावर शिरशिरी उठू लागली आणि पितांबरधारी यजमान आणि शालूतल्या यजमानणीची लगबग वाढली. गोरज मुहूर्त साधायचा होता. पुरोहित येताच विघ्नहर्ता गणपतीपूजनानं विवाह विधींना आरंभ झाला. वर गेले चार महिने वधुच्याच घरात झोपला आहे. वर आहे छान, पण मुलखाचा झोपाळू. त्याला जागं करण्यासाठी वृंदावनात चारही बाजूंनी वेदघोषासह घंटानाद करत वृंदावनात दूध ओतलं जातय. ‘यो जागा मृचमय: कामयन्ते.. उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंदऽऽ’, त्याला जागं करणारा हा प्रबोधोत्सव. एकदाचा हा श्रीधर वर जागा होऊन मंडपात येतोय. लगीनघाई उडतेय. अक्षता वाटल्या जाताहेत. अंतरपाट धरून मंगलाष्टकांच्या सुरेल आवाजात फटाक्यांच्या गजरात यजमान दोघांच्या गळ्यात परस्परांच्या वतीने मालार्पण करताहेत. या नंतर पाणिग्रहण, कन्यादान. हे दान विधिवत होण्यासाठी वराला दक्षिणा. त्वरीत जोडप्याला मंत्रानीच मधुचंद्रसुद्धा. आता लक्ष्मीनारायणाचा जोडा आपल्या दारात आला आहे, म्हणून त्याची आरती मंत्रपुष्प. स्वस्तिमंत्रानी त्यांना सहकुटुंब प्रदक्षिणा करून त्यांचा आशीर्वाद हे यजमान सहकुटुंब घेत आहेत. उपस्थितांना स्वागत समारंभात अत्तर, गुलाब, अल्पोपहार पोहे, उसाचे कांडे, खोबरं, चुरमुरे, बत्तासे वगैरे वाटून कार्यक्रम संपेपर्यंत चंद्राची शीतल किरणं आसमंत चंदेरी करतात. कन्यादानाचं पुण्य पदरात पाडून यजमान कृतकृत्य. चिंचा-आवळे खाऊन बच्चे मजेत. या मोसमातल्या नवीन ताज्या पदार्थाच्या मेजवानीनं उपस्थित मंडळी प्रसन्न. या विवाहात कन्या यजमानाच्या दारातच राहणार असल्यानं पाठवणी नाही. रडारड नाही. सारेच खूश. तुलसीविवाह हा धार्मिक विधी काही विशेष उद्देशानं आपल्याला करण्यास सांगितला आहे. हा विष्णूप्रबोधोत्सव तुलसीविवाह म्हणून साजरा केला जातो. ‘देवशयनी (आषाढी) एकादशी’ला तुलसी वृंदावनात विष्णू झोपतो. त्याला चार महिन्यांच्या प्रदीर्घ झोपेतून ‘प्रबोधिनी (कार्तिकी) एकादशी’ला जागं करण्याचा उत्सव हा प्रबोधोत्सव. यासाठी वंृदाजालंधर कथेला आधार दिला आहे.
जालंधर हा असुरवृत्तीचा. त्यामुळे त्याचा नाश होणं अत्यावश्यक. पण त्याच्या पत्नीच्या पतिव्रत्यामुळे तो युद्धात अमर होतो. नाइलाजानं श्रीविष्णू जालंधराचे रूप घेऊन वृंदेच्या महालात येतो. वृंदा त्याला खरा जालंधर समजून त्याची कामेच्छा पूर्ण करते. तिचं पातिव्रत्य भंग झाल्यानं खरा जालंधर मरतो. वृंदेच्या खरा प्रकार लक्षात येताच, ती विष्णूला शाप देते व स्वत: अग्निप्रवेश करते. शापानं विष्णू वृंदेनं अग्निप्रवेश केलेल्या जागी म्हणजे वृंदावनात भ्रमिष्ट होऊन राहू लागतो. कालांतरानं वृंदासती तुळशीच्या रूपात जन्माला येते. विष्णू तिच्याशी विवाह करून शापमुक्त होतो. ही एक संस्कारकथाच आहे. नियम देवादिकांनाही बंधनकारक आहेत. श्रीविष्णू हा विश्वाचा पालनकर्ता देव आहे. अपरिहार्यतेनं, जाणिवपूर्वक किंवा अजाणतेपणे नियम मोडला तरी शासन अधिकारप्राप्त आहे. शासनकर्तेही याला अपवाद नाहीत. शारीरिक संबंधासाठी विवाहाची अपरिहार्यताही ही कथा व दरवर्षीचा तुलसीविवाह आपल्या मनावर कोरतो.
आपण पालन केलेल्या प्राणी, वनस्पती यांच्या सर्व गरजांची पूर्तता करणं, हे आपलं कर्तव्य आहे. योग्य वेळी केवळ अन्नपाणी औषधौपचारच नव्हे तर योग्य वेळी योग्य जोडीदार मिळवून देणंही गरजेचं आहे. वनस्पती आपलं स्थान स्वेच्छेनं बदलू शकत नाहीत. निसर्गातील वारा, पाणी, यांच्या मदतीनं त्यांचं परागीभवन होऊन बीजनिर्मिती होते. हे ज्याच्या इच्छेवर अवलंबून त्या पालनकर्त्यां विष्णू देवालाच त्या वीज निर्मितीसाठी अर्पण करणंच योग्य. प्रातिनिधीक स्वरूपात हा तुलसी विवाह.
मानवी समाजव्यवस्थेला आधार असलेल्या कुटुंबसंस्थेचा पाया आहे ‘विवाहपद्धती’. हिंदुधर्मामध्ये विवाहबाह्य शरीरसंबंध हे आजही अनैतिक समजले जातात. समाज हा केवळ मनुष्यप्राण्यांचा कळप नाही. त्याला नीतिनियमांची बंधनं आहेत. विवाह हेही त्याच्या मूळ पाशवी वृत्तीला आळा घालणारं एक सामाजिक बंधन आहे. विवाह हा एक केवळ विधी नसून तो एक संस्कार आहे. लहान मुलं मोठयांचं अनुकरण करतात तसंच समाजातली सर्वसामान्य माणसं त्यांच्यामते श्रेष्ठांचं तेवढं अनुकरण करतात. समाज मनावर एखादी गोष्ट बिंबवण्यासाठी काही मार्ग आहे. समाजाकडून अपेक्षित आचरणाचं उदात्तीकरण करणं. अशा कृत्यांना पुण्यकर्म ठरवणं त्यासाठी कथा प्रसृत करणे. श्रेष्ठांनी जाणीवपूर्वक तसं आचरण ठेवणं, हे त्यातले काही मार्ग आहेत.
तुलसीविवाह हे त्याचं एक उदाहरण आहे. स्वत:च्या अपत्याला किंवा पाल्याचा विवाह योग्य वयात अनुरूप जोडीदाराशी होणं आवश्यक आहे. ती प्राथमिकतेनं आपली जबाबदारी आहे. समाजात विवाहबाह्य शारीरिक संबंध किंवा प्रजोत्पादन निषिद्ध आहे. अंगणातली तुळस ही यजमानाची पाल्य आहे. तिला वंशवृद्धीक्षम होताच निसर्गरूपी देवाला अर्पण करणं म्हणजेच ‘तुलसीविवाह’.
आपण देवांची लग्न लावतो. अजाण मुलं बाहुला-बाहुलीचं लग्न लावतात. रस्त्यावरच्या खेळातलं गाय-बैलाचं लग्न. या सर्व घटना समाजात ‘लग्न आवश्यक आहे’ हा संस्कार बालवयापासून नकळत घडवतात. आज घटस्फोट, कुमारीमाता व मुक्त लैंगिक संबंध यांनी ढासळू पाहणारी कुटुंबसंस्था टिकवण्यासाठी भारतीयांकडे अमेरिका आणि इतर विकसित देश अभ्यासवृत्तीनं पाहत आहेत. कारण आजही आपल्याकडे या तिन्ही घटनांचं प्रमाण इतर राष्ट्रांच्या तुलनेनं फार कमी आहे. रोज तुळशी वृंदावनाचा परिसर स्वच्छ ठेवणं, तिला पाणी देणं, रोज पूजा करणं, प्रदक्षिणा घालणं वगैरे गोष्टी सर्वाना करण्यास धर्मशास्त्र सांगतं. तुळशीच्या सान्निध्यात रोज काही काळ घालवण्याचा संस्कार व्हावा, म्हणूनच हा केवळ धार्मिक संस्कार नसून त्यामागे वैज्ञानिक दृष्टीही आहे. वनस्पती श्वसन करतात. दिवसा त्या कार्बन-डाय-ऑक्साइड घेऊन हवेत प्राणवायू सोडतात. हवा शुद्ध करतात. पण रात्री त्या कार्बन-डाय-ऑक्साइड हवेत सोडतात. तुळस हीच एक अशी वनस्पती आहे, जी दिवसा हवेत ओझोनची तर रात्री हवेत प्राणवायूची भर घालते. नेहमीच्या गरजेच्या औषधी वनस्पतींचं संवर्धन आणि सहज उपलब्धतेची व्यवस्था जुन्या जाणकारांनी केली. यात तुळशीला तर अंगणात स्वतंत्र स्थान. वृंदावनाची वेगळी मर्यादा, नित्य स्वच्छता, तिचा विवाह अशी खास व्यवस्था करण्याचं तसंच तिला देवपत्नीचा मान मिळण्यासाठी तिचे आणखी काही गुणही कारणीभूत आहेत.
तुळशीचे औषधी गुण....!!
तुळशीला देवपत्नी होण्याचा मान मिळाला, तो तिच्या अतुलनियतेमुळेच. ती रात्रंदिवस हवा शुद्ध करते. तुळशीच्या संस्कृत नावाच अक्षरक्ष: अर्थच आहे. ‘तुलना नाही अशी’ आणि खरोखरच तिच्या गुणांना तुलना नाही.
या तुळशीला इंग्रजीत ‘सॅक्रेड बेसिल’, ‘होली बेसिल’ व लॅटिनमध्ये ‘ऑसिमम सॅक्टम’ या नावानं ओळखतात. ही परिचित औषधी वर्षायू, वर्षभर जगणारी, केसाळ, शाखामुक्त, ३०-७५ सें.मी. उंच वाढणारी वनस्पती आहे.
तुळशीच्या औषधी गुणधर्माची बहुतेक भारतीयांना आणि जगातील अनेक जाणकारांना माहिती आहे. भारतीयांना ती ५००० वर्षापासून ज्ञात आहे. चरक संहितेत व पाणिनीच्या अष्टाध्यायात ‘सुरस’ या नावानं तिचा उल्लेख आहे. तुळस डासांनाही दूर पळवते.
आयुर्वेदीय उपचारातही तुळशीचे गुण सांगितले आहेत. तुळशीची पानं ‘कफोत्सर्जक (कफ काढून टाकणारी)’, तिचा रस घाम आणणारा व पाळीच्या तापावर उपयुक्त असून उत्तेजक व श्वासनलिकादाह कमी करणारा आहे. कानदुखीवर कानात रसाचे थेंब टाकतात आणि नायटा व इतर चर्मरोगांवर बाहेरून लावतात. वाळलेल्या पानांचं चूर्ण पडसं झालं असता तपकिरीप्रमाणे ओढतात. पानांचा काढा मुलांना पोटाच्या विकारांवर उपयुक्त असतो. जखमेवर पानाचा रस प्रथमोपचार म्हणून लावतात. मुखदरुगधावर ताजी पानं चावून खातात.
पानांपासून वाफेनं उध्र्वपातन करून पिवळे जर्द तेल मिळतं. ते जंतूनाशक व कीटनाशक आहे. बिया मूत्रविकारांवर आणि जननेंद्रियांच्या काही विकारांवर गुणकारी असतात. मुळांचा काढा तापात घाम आणण्यास उपयुक्त आहे.
रानतुळस : हिची अनेक शारीरिक लक्षणं तुळशीप्रमाणे आहेत. हिला अधिक दाट गंध असून हिच्यापासून काढण्यात येणारं तेल जंतूरोधक व कमी विषारी असतं. या तेलाचा उपयोग कानदुखी, दातदुखी व लहान मुलांची पोटदुखी यांवर करतात. पानांचा काढा वीर्यदुर्बलतेवर देतात. रानतुळस पाचक, पौष्टिक, उत्तेजक, शामक, लघवी साफ करणारी, सूक्ष्मजंतूंची वाढ होण्यास प्रतिबंध करणारी वा त्यांचा नाश करणारी व ओकारी थांबवणारी असते. पानांचा रस खोकल्यावर, पोटदुखीवर देतात, बी डोकेदुखी, तंत्रिका शूल मज्जातंतूतील तीव्र वेदना, आमांश इत्यादींवर उपयुक्त असते.
कापूर तुलसी : तुळशीच्या या जातीपासून कापूर मिळतो. तुळशीला औषधी वनस्पतींची राणी म्हटलं जातं ते उगाचच नाही. जिवंत तुळस असलेलं वृंदावन ही बिनखर्चाची प्रथमोपचार पेटी आहे. या खंडप्राय देशातल्या हजारो वर्ष ती अव्याहतपणे विराजमान आहे. घरात शेकडो रुपयांची औषधं, गोळ्या ताप, सर्दी व प्रथमोपचाराच्या नावाखाली आणून मुदतबाह्य झाल्यानं ते पैसे पाण्यात घालण्यापेक्षा तुळशीच्या मुळात पाणी घालावं. अशी ही औषधं कायम आपल्याला स्वच्छ, ताज्या स्वरूपात, दिवसरात्रीच्या गरजेच्यावेळी सहज उपलब्ध व्हावी, तिचं आरोग्यदायी सानिध्य लाभावं म्हणून, तिच्या बद्दल कृतज्ञता म्हणून पूजा, स्वच्छता व समाजमनावर संस्कार होण्यासाठी तिचा विवाह हा सर्व ज्ञात्यांनी जाणीवपूर्वक करावा.