*चोपडा येथे बळीराजा दिवस उत्साहात साजरा.. शेतकरी शेतमजूर यांचा सत्कार*
*चोपडा दि.५(प्रतिनिधी):- श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा ,प्रदेश तेली महासंघ चोपडा तालुका ,व संत जगनाडे जगदीश गोपाल गोशाळा व अनुसंधान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा दिवस मोठ्या उत्साहात चोपडा येथे संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे संपन्न झाला. शेतकरी व शेतमजूर यांचा सन्मान वाढावा व बळीचे राज्य येवो म्हणून सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाज रत्न आदर्श शिक्षक तुकाराम एम. चौधरी होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात के. डी. चौधरी यांनी बळीराजाचे महत्व विशद केले. शेतकरी सुखी तर देश सुखी हा विचार मांडताना शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे राहावे असे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी शेतात राबराब राबणारारे शेतकरी श्री जगदीश झुलाल मिस्त्री यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात शेतमजूर श्री लक्ष्मण महाजन यांचा सत्कार करून समस्त शेतकरी व शेतमजूर बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. टी. एम. चौधरी व श्री प्रशांत चौधरी यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सुरुवातीला संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मुर्तीस माल्यार्पण करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सतत मदतीला असणारे नागराची पूजन करण्यात येऊन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात , तुकाराम एम. चौधरीसर यांनी शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून या अन्नदात्याची ,त्याच बरोबर सीमेवर लढणाऱ्या सैनिकाची सतत आठवण ठेवावी व त्यांना संपूर्ण बळ द्यावे हे सांगत असताना, गोमातेला राष्ट्र मातेचा दर्जा द्यावा यासाठी आवश्यक ती पावले आपल्या संस्थेने उचलावीत असे नमूद करून शेतकऱ्यांवरची इडा पिडा टळू दे अशी प्रार्थना केली. यावेळी प्रशांत चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. ह-भ-प गोपीचंद महाराज यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी देवकांत चौधरी, नारायण चौधरी ,प्रकाश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.