चोपडा येथे भाटगल्लीतील अंगणवाडी क्रमांक ११६ मध्ये..पोषण आहार जनजागृती अभियान..कार्यक्रमाध्यक्ष नगरसेवक गजेंद्र जैस्वाल यांनी केले लस घेण्याचे आवाहन
चोपडा दि.०१ (प्रतिनिधी)
"पोषण माह" अंतर्गत एकात्मिक बाल विकास प्रकल्प, नागरी जळगाव यांचे अधिनस्त बीट क्रमांक ६, शहर-चोपडा येथे भाटगल्लीतील अंगणवाडी क्रमांक ११६ मध्ये षोषण आहार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगरसेवक मा.श्री. गजेंद्र जैसवाल सरांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी दीप प्रज्वलन करून कांतीज्योती सावित्रीबाई तसेच सरस्वती माता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर डॉ. कमलेश पाटील सर यांनी पौष्टिक आहार व कुपोषणाच्या संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले. त्यानंतर मुख्यसेविका श्रीमती. प्रविणा तडवी मॅडम यांनी गरोदर माता व स्तनदा माता, किशोरी मुली, बालके यांना द्यावयाचा पोषण आहार व पौष्टिक आहार हा तिरंगी झेंड्याप्रमाणे असावयास हवा याचे उदाहरणासह स्पष्टीकरण केले. अध्यक्षीय भाषणात श्री गजेंद्र जैसवाल यांनी पोषण आहार विषयी माहिती देऊन सर्व नागरिकांनी, महिलांनी, स्तनदा माता यांनी कोरोना या आजारापासून बचाव होण्यासंदर्भात संदर्भात माहिती देऊन शासनाने जी लस उपलब्ध करून दिली आहे ती प्रत्येकाने घ्यावयाचे असे सूचित केले
पोषण आहार जनजागृती अभियान हा कार्यक्रम दिनांक १ सप्टेंबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ असा संपूर्ण महिनाभर राबविण्यात आला. महिनाभर चाललेल्या या संपूर्ण कार्यक्रमात भाटगल्ली परिसरातील गरोदर माता, स्तनदा माता, महिला भगिनी, मुले, मुली, बाळ गोपाळ इत्यादी सर्व घटक उपस्थित होते. कार्यक्रमात किशोरी मुलींना वही व पेन वाटप करण्यात आले. सर्व सेविका व मदतनीस यांनी विविध पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते. या पौष्टिक पदार्थांची आपल्या सर्वांगीण विकासासाठी कशा प्रकारे आवश्यकता असते, याबाबत माहिती देण्यात आली. पोषण आहार व बेटी बचाव संदर्भात विविध रांगोळ्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयु शिंपी व आभार प्रदर्शन ललिता पाटील यांनी केले. सर्व सेविका व मदतनीस कार्यक्रमाला हजर होत्या.