ज्या ब्रिटिश साम्राज्याविरोधात म.गांधीजींनी लढा दिला त्या इंग्लंडमध्येही त्यांचा पुतळा..जगाच्या टाॅपर देशांनीही बांधले पुतळे.. अन् बराक ओबामांही म्हणतात गांधींमुळेच मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होऊ शकलो..मात्र आपल्याच देशात गांधीद्वेषी विशिष्ट जमात गांधीजींच्या नावाने गलिच्छ शब्दात शिमगा का करतात...हा एक मन सुन्न करणारा प्रश्न..!
(महात्मा गांधी हे जागतिक कीर्तीचे अग्रगण्य नेते होते यावर जगाने केव्हाच शिक्कामोर्तब केले आहे. पण आपल्याच देशातील गांधीद्वेषी विशिष्ट जमात न्यूनगंडग्रस्त असल्यामुळे ती जमात गांधीजींच्या नावाने गलिच्छ शब्दात शिमगा करत असते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आज गांधी जयंतीच्या निमित्ताने गांधीजी किती महान होते हे समजून घेण्यासाठी केलेली ही पुस्तक शिफारस...🙏 )
पुस्तक: गांधी का मरत नाहीत
लेखक: चंद्रकांत वानखेडे
प्रकाशक: मनोविकास प्रकाशन
लेखक प्रस्तावनेतील पान क्रमांक ९वर लिहितात...
मोहनदास करमचंद गांधींना महात्मा म्हणून या देशात 'राष्ट्रपिता' म्हटलं गेलंय. विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ थोर पुरुष म्हणून जगाने ज्यांची निवड केली, ज्यांचे पुतळे जगातील बहुतांश देशात उभे आहेत, ज्या ब्रिटिश साम्राज्याविरोधात गांधीजी लढले; त्या इंग्लंडमध्येही त्याचा पुतळा आहे. ज्यांनी त्यांनां साम्राज्यवादाचा दलाल म्हणून हिणवलं, त्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या देशामध्येही त्यांचा पुतळा आहे. आत्ताच्या घडीला जगाच्या नकाशावर 'ठाणेदार' म्हणून वचक असलेल्या अमेरिकेमध्येही त्यांचा पुतळा आहे. असं काय या भणंग, अर्धनग्न या महान फकिराकडे होतं, की त्याचे पुतळे जगभरातील बहुतांशी देशांना उभारावेसे वाटले? ते काय कोण्या बलाढ्य देशात जन्माला आले होते? की ते काय कोणत्या पदावर होते की ज्याच्या धाकाने जगभरातील देशांना त्यांचे पुतळे उभारणं भाग पडलं? पुतळ्याचं सोडाच; पण महात्मा गांधींच्या सन्मानार्थ जगभरात इतकी टपालांची तिकीटं निघाली आहेत, की ज्याची गणतीच नाही. पण का?
हा प्रश्न तर परत शिल्लक राहतोच. त्याचं उत्तर आहे विसाव्या शतकात भारतासारख्या देशाने महात्मा गांधींच्या रूपात जगाला अमूल्य अशी भेट दिली, अशी संपूर्ण जगाची धारणा आहे. आणि म्हणूनच मग गांधींचे पुतळे जगभर बसविले जातात. त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटांचं जगभर विमोचन केलं जातं. गांधींवर देश-विदेशात असंख्य अशी पुस्तकं लिहिली जातात. व तेवढ्याच संख्येने ती वाचली जातात. गांधींवर एखाद्या विदेशी माणसाला सिनेमा काढावासा वाटतो. तो सिनेमा काढतो. आणि जगभराच्या लोकांना तो आवर्जून पाहावासा वाटतो. नव्हे जगभराचे लोक अॅटनबरोने काढलेला गांधींवरील सिनेमा अक्षरश: डोक्यावर घेतात. गांधीजी भारतातले, पण सिनेमात का होईना त्याला पाहण्यासाठी जगभरचा प्रेक्षक थिएटरमध्ये तुफान गर्दी करतो! विदेशी सिनेमाचं जाऊ द्या, पण देशी माणूसही त्याच्यावर सिनेमा काढतो आणि 'लगे रहो मुन्ना भाई' गांधींमुळे हिट होतो.
गांधींवर लिहिलेल्या पुस्तकाचं तर सोडाच, पण स्वतः गांधींनी लिहिलेल्या पुस्तकांची विक्री आजही जगभर तडाख्याने होताना दिसते. त्यातही हिटलरच्या जर्मनीमध्ये तर ती अधिकच होते. मार्टीन ल्यूथर किंगला त्यांच्या चळवळीचा आधार गांधी वाटतो. नेल्सन मंडेलांना गांधी ही त्यांच्या चळवळीची प्रेरणा वाटते. तर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचा अध्यक्ष राहिलेल्या बराक ओबामांना गांधींमुळेच मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होऊ शकलो असं वाटतं. हा काय चमत्कार आहे? आईन्स्टाईनसारख्या माणसाला 'गांधींसारखा हाडामासाचा माणूस प्रत्यक्षात या पृथ्वीतलावर होऊन गेला, यावर पुढील पिढी कदाचित विश्वास ठेवणार नाही', अशी प्रतिक्रिया नोंदवावीशी वाटते. यातच सगळे काही आले.