घराची भिंत कोसळल्याने मोठ्या आवाजाचा प्रचंड धमाका..
कोळी कुटुंब बालंबाल बचावले..
चोपडा दि.२०(प्रतिनिधी)-म्हणतात ना ज्याला तारणारा देव आहे त्याला कोणीही मारू शकत नाही या ओवीना अनुसरून चोपडा तालुक्यातील वडती गावात अशीच एक घटना घडली आहे. तालुक्यातील वडती गावातील कोळीवाड्यात मंगल कचरू कोळी हे गरीब कुटुंब वास्तव्यास आहेत.त्यांच्या या कुटुंबात दोन लहान मुलांसहीत एकूण सात सदस्य आहेत.दि.१९ रोजी मध्यरात्री ते आपल्या कुटुंबासोबत निद्रा अवस्थेत असतांना अचानक त्यांच्या घराची भिंत कोसळली व मोठ्याने आवाज झाला.या भयावह घटनेने संपूर्ण कोळीवाडा हादरला व घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.या ढिगाऱ्याखाली कुटुंबप्रमुख मंगल कोळी यांचा मोठा मुलगा शरद व सून लक्ष्मी व त्यांचे ३ वर्षाचे लहान बाळ हे दाबले गेले परंतु नागरिकांनी त्यांना तात्काळ ढिगाऱ्याखालुन काढून पुढील उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
कुटुंबातील इतर सदस्य मंगल कोळी,उषाबाई कोळी,भाऊसाहेब कोळी,श्रद्धा कोळी हे देखील जखमी झाले आहे या घटनेत सुदैवाने जीवितहानी जरी झाली नसली तरी यापूर्वी पाच ते सहा वेळा या कोळीवाड्यात अशा घटना घडल्या असल्याचे नागरिकांनी सांगितले.यात या गरीब कुटुंबाचे फार मोठे नुकसान झाले असून त्यांच्या डोक्यावरचे छप्पर नाहीसे होत संसार उघड्यावर आला आहे.त्यामुळे या कुटुंबाला अश्रु अनावर झाले होते.शासनाने या नागरिकांना घरकुल योजनेतून लाभ मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
सदर घटनेत मदत कार्यासाठी तुळशिराम कोळी,सुधाकर कोळी,भाऊसाहेब कोळी, मिलिंद वाणी,सागर कोळी,विजय कोळी यांच्यासह गावातील नागरिक,महिलावर्ग यांनी मेहनत घेतली.ग्रामपंचायत सदस्य यांनी भेट देऊन पाहणी केली.तर पंचनामा करणेसाठी महसूल विभागाला कळविण्यात आले आहे.