*चोपडा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी..नियुक्ती पत्रक अजून गुलदस्त्यातच.. अरुणभाई गुजराथी म्हणतात काहीच झाले नाही..जिल्हाध्यक्ष म्हणतात हा विषय कानापर्यंतही नाही..भाईसाहेब सांगतील तिच माझी पूर्व दिशा.. दरम्यान तालुकाध्यक्षांचा मोबाईल स्विच ऑफ ...*
चोपडा दि.०२ (प्रतिनिधी) : चोपडा येथे वरीष्ठांना डावलून नुतन पदाधिकाऱ्यांची निवड झाली खरी..मात्र तालुकाध्यक्षांनी नियुक्ती पत्रच न दिल्याने अनेकांची भंबेरी उडाली आहे.एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहून तोंडात बोट घालण्या शिवाय पर्यायच कोणाकडे उरलेला नव्हता.याप्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एकमेकांना विचारल्या शिवाय निवडीचे काम होत असल्याने अन्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हे कायं चाललंय या चर्चेचे गुऱ्हाळ चघळण्यात आख्खा दिवस गेल्याचे चित्र आज होते.राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता या प्रकारावर तीव्र खेद व्यक्त केला आहे . राष्ट्रवादीत छेद पडण्याची प्राथमिक चिन्हे दिसू लागल्याचे जन माणसातून बोलले जात आहे. दरम्यान माजी विधानसभा सभापती अरुणभाई
गुजराथी यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता कुठेही काहीही झाले नाही असे सांगून विषयाला पूर्ण विराम दिला आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी स्पष्ट केले की, माझ्याकडे चोपडा शहराध्यक्ष पदाचा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही व मी तसे कुठलिही नियुक्ती पत्र दिलेले नाही.. अरुण भाई गुजराथी सांगतील तिचं माझी पूर्व दिशा असते..ते जो निर्णय घेतील तो मला मान्यच असतो असेही श्री.पाटील यांनी बोलतांना सांगितले..इकडे मात्र तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा मोबाईल नंबर बंद असल्याचे संकेत देत असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.त्यामुळे नव नियुक्ती पत्राविषयी अधिक माहिती प्राप्त होऊ शकली नाही.दुपारच्या सुमारास काही कार्यकर्त्यांना अरुणभाई गुजराथी यांनी माझ्या राजकिय कारकिर्दीत असला कुठलाही प्रकार झाला नसून पक्ष कामाला अधिक महत्त्व दिले असल्याचे सांगत चांगलेच कान टोचल्याचे समजते.या प्रकारावर तीव्र नापसंती भाईंनी व्यक्त केली आहे
काल चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष धर्मेंद्र मगरे यानी वैदयकीय कारणाने राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर पक्षाचे कार्यकर्ते श्यामसिंग परदेशी यांची निवड करण्यात आली. सदर निवडीबाबत राष्ट्रवादीचे नेते अरुणभाई गुजराथी यांना कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याने व तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील हे परदेशी यांना निवडीचे पत्र देण्यास तयार नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष पद वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
१ रोजी सकाळी १० वा. चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस व गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिकेच्या
म्युनिसिपल हायस्कूलच्या प्रांगणात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रहास गुजराथी गटाने रिक्त असलेल्या शहराध्यक्ष पदासाठी श्यामसिंग ईश्वरसिंग परदेशी यांची नियुक्ती करून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते त्यांचा शुभेच्छापर सत्कार उरकून टाकला. तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांना ही निवड मला अमान्य असून निवडीबाबत मला काहीही माहिती नाही त्यामुळे मी शहराध्यक्ष निवडीचे पत्र देणार नाही, असा स्पष्ट नकार दिला. त्यामुळे नाट्यमय घटना घडली आहे.