डॉ. कुणाल गायकवाड यांना कबचौउमविचा ‘संशोधन पुरस्कार ..दुसऱ्यांदा सन्मान; सन २०२२-२३ नंतर २०२४-२५ मध्येही पुरस्कार

 डॉ. कुणाल गायकवाड यांना कबचौउमविचा ‘संशोधन पुरस्कार ..दुसऱ्यांदा सन्मान; सन २०२२-२३ नंतर २०२४-२५ मध्येही पुरस्कार


चोपडा,दि.७(प्रतिनिधी) : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चोपडा येथील पदव्युत्तर व संशोधन विभागाचे प्रमुख तथा इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रोफेसर डॉ. कुणाल दामोदर गायकवाड यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे सन २०२४-२५ चा ‘संशोधन पुरस्कार (प्रकाशन)’ प्रदान करण्यात आला.

डॉ. गायकवाड यांनी सन २०२४-२५ मध्ये उल्लेखनीय संशोधनपर लेख प्रकाशित करून संशोधन क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित विद्यापीठ वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कबचौउमविचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. महेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद राऊत तसेच विद्यापीठातील विविध मान्यवर, प्राध्यापक, संशोधक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे, डॉ. कुणाल गायकवाड यांना संशोधन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार दुसऱ्यांदा प्राप्त झाला आहे. यापूर्वी सन २०२२-२३ मध्येही त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे संशोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सलग संशोधन कार्य, दर्जेदार संशोधन प्रकाशने आणि संशोधन क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची विद्यापीठाने घेतलेली ही दखल त्यांच्या संशोधन प्रवासातील महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे.

डॉ. गायकवाड यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. संदीप सुरेश पाटील, सचिव मा. डॉ. स्मिता संदीप पाटील आणि दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. संध्या एम. सोनवणे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच महाविद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी डॉ. गायकवाड यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे महात्मा गांधी शिक्षण मंडळ तसेच दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने