चोपड्यात दूषित पाण्यावरून विरोधक आक्रमक! फिल्टर प्लांटची अचानक पाहणी
चोपडा दि.१३(प्रतिनिधी) : चोपडा शहरातील गढूळ व दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले असून, विरोधी नगरसेवकांनी थेट प्रशासनाला धारेवर धरले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पाणी तपासणीचे प्रयोगशाळा अहवाल तातडीने सार्वजनिक करा आणि दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी केली आहे.
शहरातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून गढूळ व अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत असल्याचे विरोधी नगरसेवकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर त्यांनी फिल्टर प्लांटची अचानक पाहणी करून पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया, पाणीपुरवठा यंत्रणा आणि नागरिकांना वितरित होणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाला जाब विचारला.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ नका!
दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांकडून नियमित पाणीपट्टी व कर आकारला जात असताना त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, अशी भूमिका विरोधी नगरसेवकांनी मांडली.
गढूळ पाणी येतेय, मग तपासणी अहवाल कुठे?’
पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पिण्याच्या पाण्याची नियमित प्रयोगशाळा तपासणी होते का? नमुन्यांचे अहवाल कुठे आहेत? नागरिकांना हे अहवाल का उपलब्ध करून दिले जात नाहीत? गढूळ पाणीपुरवठ्याचे नेमके कारण काय? नागरिकांच्या तक्रारींवर आतापर्यंत काय कार्यवाही करण्यात आली? असे सवाल उपस्थित करण्यात आले.
पाण्याचे अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी
शहरातील पाण्याचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तातडीने तपासण्यात यावेत आणि तपासणीचे संपूर्ण अहवाल नागरिकांसमोर जाहीर करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. पाणीपुरवठा व्यवस्थेत कोणाचीही चूक अथवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशीही मागणी विरोधकांनी केली. यासोबतच भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणीही करण्यात आली.
‘ ठोस कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!’
दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही, तर नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विरोधी नगरसेवकांनी दिला.
पत्रकार परिषदेस गटनेता व नगरसेवक गजेंद्र जैसवाल, नरेंद्र पाटील, सौ. संध्या महाजन, डॉ. रोहन पाटील, भूपेंद्र गुजराथी, सौ. पूजा देशमुख, शरद पाटील, शकिलाबी बागवान, सामाजिक कार्यकर्ते नरेश महाजन तसेच युवा मोर्चा उपाध्यक्ष करण वाडेकर उपस्थित होते.
चोपड्याच्या नळातून येणारे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का? आता या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाच्या अधिकृत पाणी तपासणी अहवालातूनच स्पष्ट होणार आहे.
