कस्तुरबा विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त... बाल दिंडी सोहळा..!एसआयआर व प्लास्टिक मुक्त शहर वर दिला संदेश..!
चोपडादि.२६(प्रतिनिधी) -- शहरातील कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, अ.मु.साळुंखे प्राथमिक विद्यालय, महात्मा गांधी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २५ रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून 'बाल दिंडी सोहळ्याचे' अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. दिंडीत विशेष आकर्षण म्हणजे निवडणूक आयोगाने राबविलेला एसआयआर उपक्रम व प्लास्टिक मुक्त शहर यावर विद्यार्थ्यांनी संदेश दिला..!
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान करून विठूनामाचा गजर करत संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध केला.पालखी पूजन आणि सोहळ्याची सुरुवात सकाळी ठीक ८ वाजता शाळेच्या प्रांगणात मुख्य कार्यक्रम सुरू झाला. विद्यालय मुख्याध्यापक एस एल पाटील, एन एस सोनवणे,भूपेश सोनवणे, प्रतिभा बाविस्कर यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले.
'ज्ञानबा-तुकाराम' आणि 'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल' या जयघोषात दिंडीने मार्गक्रमण केले.पारंपरिक वेशभूषा आणि मुख्य आकर्षणे दिंडी सोहळ्यामध्ये प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. मुलांनी पांढरा कुर्ता-धोती, डोक्यावर गांधी टोपी किंवा कपाळावर बुक्का-चंदन लावले होते, तर मुलींनी नऊवारी साड्या नेसून, डोक्यावर तुळशी वृंदावन व कलश घेतले होते. दिंडीमध्ये विठ्ठल, रुक्मिणी, यांची हुबेहूब रूपे साकारली.छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्यार्थीनींनी सुंदर असा रिंगण सोहळा तयार केला.यात विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या तालावर ठेका धरत फुगड्या खेळल्या आणि भजने गायली. टाळ मृदुंग तसेच लेझिम वर सुन्दर असे नृत्य केले.विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊन नाचणाऱ्या लहान मुलांमुळे चौकात जणू पंढरीचेच वातावरण निर्माण झाले होते.पर्यावरण आणि सामाजिक संदेशकेवळ धार्मिक उत्सव म्हणून मर्यादित न राहता या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेशही दिले. विद्यार्थ्यांनी हातात 'झाडे लावा, झाडे जगवा', 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' आणि 'स्वच्छ भारत, सुंदर भारत' अशा आशयाचे फलक धरून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांना परंपरेनुसार साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो -- चोपडा येथे कस्तुरबा प्राथमिक माध्यमिक विद्यालय व महात्मा गांधी प्राथमिक माध्यमिक विद्यालय यांचा निघालेला दिंडी सोहळा..
