अडावद येथे उद्या भव्य 'महाराजस्व समाधान शिबीर'; शासकीय योजनांचा थेट लाभ मिळण्याचे आवाहन

 अडावद येथे उद्या भव्य 'महाराजस्व समाधान शिबीर'; शासकीय योजनांचा थेट लाभ मिळण्याचे आवाहन


अडावद ,ता. चोपडा,दि.२६(प्रतिनिधी ) राज्यात मुख्यमंत्री महोदय यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विधानसभा मतदारसंघनिहाय 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान' राबवले जात आहे. या अभियानांतर्गत , रविवारी (२६ जुलै २०२६) अडावद येथे विशेष महाराजस्व समाधान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

    हे शिबीर सकाळी १०:०० वाजता 'माळी समाज मंगल कार्यालय, मधला माळी वाडा, अडावद' येथे संपन्न होणार असून, याप्रसंगी  आमदार प्रा.  चंद्रकांत बळीराम सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

एकाच छताखाली विविध शासकीय विभागांचे स्टॉल्स

    नागरिकांच्या शासकीय कामांमधील अडचणी दूर करून त्यांना एकाच ठिकाणी विविध सेवा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, पंचायत समिती, भूमी अभिलेख आणि महावितरण यांसह शासनाच्या विविध प्रमुख विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. या स्टॉल्सच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक व शेतकरी बांधवांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ आणि आवश्यक दाखल्यांचे जागेवरच वाटप करण्यात येईल.

     नव्या लाभार्थ्यांना मिळणार सविस्तर मार्गदर्शन

    शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहचावी, यासाठी या शिबिरात विशेष मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन लाभार्थ्यांना विविध योजनांचे अर्ज भरण्यापासून ते मंजुरी मिळण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन अधिकारी व तज्ज्ञांमार्फत केले जाईल.

अडावद, धानोरा आणि चोपडा मतदारसंघातील सर्व नागरिक, महिला, युवक तसेच शेतकरी बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी  सकाळी ठीक १० वाजता शिबिराच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने