छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहात; विद्यार्थ्यांनी उलगडला स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास

 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहात; विद्यार्थ्यांनी उलगडला स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास

 चोपडा दि.२८(प्रतिनिधी) : तालुक्यातील सत्रासेन येथे भारतीय इतिहासातील स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आज येथे अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तिपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके १५९६ अर्थात दि. २७ जून २०२६ रोजी हा ऐतिहासिक दिवस मोठ्या श्रद्धा व अभिमानाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिवचरित्र, हिंदवी स्वराज्याची स्थापना, राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व आणि महाराजांचे राष्ट्रनिर्माणातील योगदान यावर प्रभावी मनोगते व्यक्त केली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते अखेरच्या क्षणापर्यंतचा प्रेरणादायी इतिहास समजून घेण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. डी. पी. पावरा (प्राथमिक मुख्याध्यापक) होते, तर श्रीमती वंदना सरदार पावरा (माध्यमिक मुख्याध्यापिका) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी श्री. विकास कोळी, श्री. संजय शिरसाळे आणि श्री. गजानन पाटील यांनी राज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदर्शी नेतृत्व, लोककल्याणकारी शासनव्यवस्था आणि स्वराज्य स्थापनेमागील संघर्ष याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि इतिहासाबद्दलची जिज्ञासा अधिक दृढ झाली.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. विकास पाटील यांनी केले, तर श्री. मनोज पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. भालचंद्र पवार, अधिक भादले, उदय वानखेडे, कल्पना पाटील, सरोजनी चौधरी, वैशाली अजगे, मनोज साळुंखे, पवन पावरा, अनिल राणे, अजय पावरा, योगेश गांगुर्डे, गणेश शिंदे, नरेंद्र महाजन, शीतल पाटील आणि मनोज महाजन यांनी विशेष परिश्रम घेत मोलाचे सहकार्य केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि स्वराज्याची प्रेरणा जागविणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी स्मरणात राहील, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने