सुशिल विजय पटेल यांची भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पदावर निवड
चोपडा, दि.१३(प्रतिनिधी): तालुक्यातील कुसुंबे येथील सुशिल विजय पटेल यांची भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर ( वर्ग -१) पदावर निवड झाली आहे. सुशिल यांनी पुणे येथून बी. ई. पूर्ण करून भारतीय वायुदालामार्फत घेतल्या जाणाऱ्या AFCAT या परीक्षेची तयारी केली व ती परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करून संपूर्ण (AIR - 31) भारतात ३१ वा क्रमांक मिळवला आहे. संपूर्ण भारतातून सहा लाख विद्यार्थ्यांनी दिलेल्या या परीक्षेत सुशिल यांनी पहिल्याच प्रयत्नात भारतीय वायुदलात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या फ्लाईंग ऑफिसर या पदावर मोहोर उमटवली आहे. सुशिल हे कुसुंबे येथील अक्षरवासी विजय शांताराम पटेल यांचा सुपुत्र व प्रगतीशील शेतकरी श्री. अनिल शांताराम पटेल यांचा पुतण्या आहे. लहानपणीच पितृछत्र हरपले अत्यंत कठीण अश्या प्रतिकूल परिस्थितीत संयम, जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम यांच्या जोरावर नेत्रदीपक यश संपादन केले आहे. लहानपणापासून आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न सत्यात आले आहे. संपूर्ण लेवा पाटीदार गुजर समाजातून, अनेर परिसर व चोपडा तालुक्यातून या पदावर जाणारा पहिला विद्यार्थी ठरला आहे. या यशाबद्दल कुसुंबे गावातून सुशिल यांची मिरवणूक काढण्यात आली व घरोघरी सत्कार करण्यात आले. या निवडीमुळे अनेर परिसर व चोपडा तालुक्यातील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. आपल्या दैदीप्यमान यशाचे श्रेय सुशिलने भगवान श्री स्वामिनारायण व गुरुहरी प्र.ब्र.प.पू.महंत स्वामी महाराज यांना तसेच आई मनिषाबाई, बहीण प्रतिक्षा, काका अनिल पटेल व संपूर्ण कुटुंबीय,नातेवाईक व ग्रामस्थ यांना दिले आहे.
