घोडगावचे शेतकरी कुटुंबातील दोन सख्खे चुलत भाऊ देशसेवेसाठी अग्निवीर इंडियन आर्मी मध्ये भर्ती
चोपडा,दि.३१(प्रतिनिधी)तालुक्यातील घोडगाव येथील शेतकरी कुटुंबातील दोन होतकरू युवक प्रमोद रवींद्र पाटील आणि गौरव जितेंद्र पाटील (दोघे काकांचे मुलगे) यांची अग्निवीर इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावकऱ्यांनी, मित्रपरिवाराने व नातेवाईकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करून अभिनंदनाचा वर्षाव केला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या दोघांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक युवकांना प्रेरणा मिळणार असून, "परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते" हा संदेश त्यांनी कृतीतून दिला आहे.
आज अनेक तरुण अपयशामुळे खचून जातात; मात्र प्रमोद आणि गौरव यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे यशाचे शिखर गाठले. त्यांच्या या यशाने कुटुंबासह संपूर्ण घोडगावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. त्यांच्या पुढील उज्ज्वल कारकिर्दीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
