सानेगुरुजी वसाहत परिसरात रखरखत्या उन्हात भरला जनता दरबार..चोपडा नगरपालिकेचा थेट दारात समाधान उपक्रम

 सानेगुरुजी वसाहत परिसरात रखरखत्या उन्हात भरला जनता दरबार..चोपडा नगरपालिकेचा  थेट दारात समाधान उपक्रम 

चोपडा दि.२४(प्रतिनिधी) : वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत असतानाहीचोपडा नगरपालिकेने नागरिकांच्या समस्यांप्रती आपली बांधिलकी अधोरेखित करत एक अभिनव आणि परिणामकारक उपक्रम राबविला आहे.“सुसंस्कृत चोपडा” आणि शहराच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने साने गुरुजी वसाहत येथे “समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले.

 या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून घेण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांचे तात्काळ निवारण करण्यावर भर देण्यात आला.विशेष म्हणजे, काही नागरिकांना शिबिरात उपस्थित राहणे शक्य नसल्याचे लक्षात घेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी स्वतः वसाहतीनिहाय भेटी देत नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांना समस्यास्थळीच तत्काळ उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

चोपडा नगरपालिकेची ही कार्यपद्धती पारंपरिक चौकटीच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृतीतून नागरिकांचा विश्वास संपादन करणारी ठरली आहे. या उपक्रमामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वासाची भावना अधिक दृढ झाली असल्याचे दिसून आले.

या उपक्रमावेळी नगराध्यक्षा सौ.नम्रता सचिन पाटील, उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, गटनेते पियुष चौधरी, नगरसेविका रुखसार बागवान, सामाजिक कार्यकर्ते सऊद बागवान, मुख्याधिकारी रामनिवास झंवर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिसर,तसेच नगरपालिकेचे विविध विभाग प्रमुख आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने